दगड मारल्याने पक्षी जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज

थंडीत ठाणे खाडीकिनारी येणाऱ्या रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांवर बेकायदा बांधकामांमधून राहणाऱ्यांकडून दगड भिरकावले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कोलशेत खाडी परिसरात जखमी अवस्थेत सापडलेल्या फ्लेमिंगोमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. ठाण्याच्या एसपीसीए रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या दगड मारण्यात आल्याचा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे.

नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत ठाणे खाडी परिसरात मोठय़ा प्रमाणात फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन होते. गुरुवारी कोलशेत खाडीकिनारी पक्षी सफारीसाठी आलेल्या पक्षीप्रेमींना जखमी अवस्थेतील फ्लेमिंगो दिसला. दगड मारल्याने डाव्या बाजूच्या पंखाला दुखापत झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकांकडून वर्तवण्यात आला आहे. पंखावर किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. फ्लेमिंगो पक्षी पूर्ण बरा होण्यासाठी दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे या पक्ष्यावर उपचार करणाऱ्या डॉ. सुहास राणे यांनी सांगितले.

नागरिकांनी पक्ष्यांविषयी संवेदनशीलता दाखवावी, पक्ष्यांना इजा होईल, अशी कृती करू नये. नागरिकांमध्ये पक्ष्यांविषयी संवेदनशीलता नसल्यास या प्रकारांना आळा बसणार नाही. कोणालाही जखमी अवस्थेतील पक्षी आढळून आल्यास त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे.

-रोहित जोशी, पक्षीप्रेमी