राज्य सरकारच्या नव्या रेडी रेकनर दरांद्वारे शिक्कामोर्तब; घरांचे रेडी रेकनर दर जुन्या ठाण्यातील घरांइतकेच
नौपाडा, पाचपाखाडी यांसारख्या जुन्या ठाण्यातील घरे परवडेनाशी झाल्यामुळे स्वस्त घरांच्या शोधात घोडबंदर रोड परिसराकडे धाव घेणाऱ्या सर्वसामान्यांसाठी येथील घरेही आवाक्याबाहेर चालली आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नव्या रेडी रेकनर दरांनी यावर शिक्कामोर्तब केले असून घोडबंदर रोड येथील हिरानंदानी इस्टेट परिसरातील घरांचा रेडी रेकनर दर नौपाडय़ातील घरांच्या रेडी रेकनर दरापेक्षाही जास्त असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, सध्या बांधकाम क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याचे बोलले जात असताना घोडबंदर रोडवरील घरांच्या किमतीची घोडदौड कायम असल्याचे चित्र आहे.
दरवर्षांच्या सुरुवातीला १ जानेवारी रोजी नवीन रेडी रेकनरचे दर लागू होत असतात. मात्र, यंदा हे दर नवीन आर्थिक वर्षांच्या पहिल्या दिवशी जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने डिसेंबर महिन्यातच घेतला. त्यानुसार राज्यात रेडी रेकनरच्या दरात सरासरी सात टक्के इतकी वाढ करण्यात आली असून ठाण्यासारख्या शहरात ही वाढ सहा टक्क्यांच्या आसपास आहे. रेडी रेकनरच्या दरांच्या आधारे प्रत्येक भागातील मालमत्तांचे बाजारमूल्य कमीअधिक होत असते. यंदा रेडी रेकनरमध्ये वाढ झाल्याने साहजिकच घरांच्या किमती आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
नव्या रेडी रेकनर दरपत्रकानुसार ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील मालमत्तांच्या दरात झालेली वाढ अनेकांचे लक्ष वेधू लागली असून या ठिकाणच्या काही मालमत्ता मूळ शहरापेक्षाही महाग दिसू लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. घोडबंदर मार्गावरील हिरानंदानी इस्टेट येथील रेडी रेकनरचे दर प्रति चौरस फुटाला १० हजार ८०० रुपयांपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच मार्गावरील कोलशेत, विजय गार्डन परिसरातील रेडी रेकनरचे दर प्रति चौरस फुटाला ६५०० ते ८५०० रुपयांच्या घरात पोहोचले असून ठाण्यातील राम मारुती मार्ग आणि गोखले मार्गावरील मालमत्तांचे दरही याच घरात आहेत.

टाऊनशिपमधील घरे महागच

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिजोरीवर कोणताही भार पडू नये आणि पायाभूत सुविधांचा विकास करत नव्या गृहसंकुलांची उभारणी व्हावी या उद्देशाने राज्य सरकारने आखलेल्या विशेष नागरी वसाहतींमधील (स्पेशल टाऊनशिप) घरे दिवसेंदिवस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्याचे चित्र गेल्या काही वर्षांपासून दिसत आहे. मुंबई, ठाण्याच्या बांधकाम क्षेत्रात मंदी असल्याची ओरड एकीकडे होत असताना मुंबईतील एका प्रथितयश विकासकाने घोडबंदर मार्गावर उभारलेल्या अशाच एका नागरी वसाहतींमधील घरांचा दर बाजारभावानुसार प्रति चौरस फुटामागे १५ हजारांच्या पल्याड पोहोचल्याचे चित्र मध्यंतरी पाहायला मिळाले होते.

बाजारभावांत मात्र तफावत
रेडी रेकनर दरानुसार नौपाडा आणि घोडबंदर मार्गावरील दर सारखेच दिसत असले तरी प्रत्यक्षात चित्र तसे नाही. नौपाडय़ातील व्यावसायिक मालमत्तेचे दर सद्य:स्थितीत प्रति चौरस फुटास ४० ते ५० हजार रुपयांच्या घरात असून रहिवासी मालमत्तांचे दरही १९ ते २० हजार रुपये प्रति चौरस फूट असे आहेत. घोडबंदर मार्गावरील रेडी रेकनरचे दर वाढल्याने येथील घरखरेदी मात्र तुलनेने महाग होणार आहे, असा दावा रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञ राजेश जाधव यांनी ‘लोकसत्ता ठाणे’शी बोलताना केला. या संपूर्ण पट्टय़ात घरांची विक्री रोडावली असताना मुद्रांक शुल्कात होणारी वाढ विकासकांची चिंता वाढवणारी ठरेल, असेही ते म्हणाले.