केंद्रीय पथकाची सूचना

ठाणे : जिल्ह्य़ात करोनाबाधितांची संख्या वाढल्यामुळे घाबरून जाऊ नका. रुग्णांवर वेळेत उपचार करा आणि त्यांचे प्राण वाचवून मृत्यू दर कमी करण्यावर भर द्या, अशा सूचना केंद्रीय पथकाने शनिवारी जिल्ह्य़ातील महापालिका प्रशासनाला दिल्या.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांच्या पथकाने ठाणे महापालिका मुख्यालयात शनिवारी जिल्ह्य़ातील सर्व महापालिका आयुक्तांची बैठक घेऊन आढावा घेतला.

प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांचा आढावा घेऊन त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार उपचार करावेत, प्रतिबंधित क्षेत्रात कठोर टाळेबंदीची अंमलबजावणी करावी, तसेच रुग्णांना वेळेत उपचार देणे शक्य व्हावे यासाठी जास्तीतजास्त चाचण्या वाढवा, अशा सूचना लव अग्रवाह यांनी केल्या.

विलगीकरण कक्षाची सुविधा वाढविणे, रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता राखणे, मोठय़ा प्रमाणात चाचण्या वाढविणे, यावर लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी या वेळी सांगितले.

ठाणे जिल्ह्य़ात १,४६५ नवे रुग्ण

ठाणे : जिल्ह्य़ात शनिवारी तब्बल १ हजार ४६५ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, एकूण रुग्णसंख्या २८ हजार ९४४ वर पोहोचली आहे. तर दिवभरात ३६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९४७ इतका झाला आहे.शनिवारी कल्याण-डोंबिवली शहरात ४३६, ठाणे शहर ३७१, नवी मुंबई १५०, भिवंडी शहर १०२, उल्हासनगर शहर ६०, अंबरनाथ शहर १४०, बदलापूर शहर २६, मिरा-भाईंदर शहर ८० आणि ठाणे ग्रामीणमध्ये १०० रुग्ण आढळून आले. तर, शनिवारी जिल्ह्य़ात ३६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला

संपूर्ण ठाण्यात उद्यापासून निर्बंध?

ठाणे : करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सोमवारपासून ठाणे शहरात संपूर्ण टाळेबंदी लागू करण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला आहे. या संदर्भात महापालिका आणि पोलीस प्रशासनाची आज, रविवारी बैठक होणार असून यामध्ये टाळेबंदीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. माजिवाडा-मानपाडा, वर्तकनगर, लोकमान्य-सावरकर, नौपाडा-कोपरी, उथळसर, वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा आणि दिवा अशा सर्वच प्रभाग समिती क्षेत्रांत रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे.    शनिवारी दिवसभर महापालिका प्रशासनाकडून शहरातील रुग्णसंख्येचा आढावा घेऊन संवेदनशील ठिकाणांची यादी निश्चित करण्याचे काम सुरू होते. नव्या यादीनुसार शहरातील ८० टक्के परिसर संवेदनशील क्षेत्रामध्ये येत असल्याचे समोर आल्याने संपूर्ण शहरात कठोर टाळेबंदीची अंमलबजावणी करण्याचा विचार महापालिका प्रशासनाकडून सुरु आहे. याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसून या संदर्भात आज महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची बैठक होणार आहे.