अवाच्या सवा भाडे आकारणी; वाहतूक पोलिसांकडे तक्रारींचा पाऊस

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रिक्षाचालकांच्या बेशिस्त वर्तनाचा कहर झाला आहे. रांग सोडून स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच रिक्षा उभ्या करणे, मीटरनुसार भाडे आकारण्याऐवजी अवाच्या सवा भाडे आकारणे नित्याचेच झाले आहे. वाहतूक पोलिसांचेही यावर नियंत्रण नसल्यामुळे रिक्षाचालकांना मोकळे रान मिळाले आहे.

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात सॅटिसखाली महापालिकेने रिक्षाचालकांना रांगा आखून दिल्या आहेत. या रांगांवर नियंत्रण असावे यासाठी या ठिकाणी वाहतूक शाखेची चौकीही उभारण्यात आली होती. काही कारणांमुळे ही चौकी अन्यत्र हलवण्यात आली. याचा गैरफायदा आता मुजोर रिक्षाचालक घेऊ लागले आहेत. थांब्यांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने सायंकाळी गर्दीच्या वेळेत प्रवाशांची अक्षरश ससेहोलपट होते. अनेक रिक्षाचालक आपल्या रांगा सोडून  स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ रिक्षा उभ्या करतात आणि प्रवाशांना कुठे जायचे आहे, हे विचारतात.

घोडबंदर, कळवा, विटावा भागात जाणाऱ्या नवख्या प्रवाशांना हे रिक्षाचालक दुप्पट पैसे आकारत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. नवख्या प्रवाशाकडून घोडबंदरसारख्या भागात येण्यासाठी १५० ते २०० रुपये आकारले जात आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी मीटरने ६० ते ७० रुपये होतात. तसेच शेअरिंग रिक्षाचालकही प्रवाशांच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर वेडय़ावाकडय़ा पद्धतीने रिक्षा उभ्या करतात. अनेकदा हे रिक्षाचालक ट्रॅफिक वॉर्डनलाही दमदाटी करतात. त्यामुळे स्थानक परिसरात रिक्षाचालकांची दहशत पसरली आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात प्रवाशांची लूट होत असताना वाहतूक पोलीस आणि आरटीओकडून बघ्याची भूमिका घेतली जात आहे.

काही दिवसांपूर्वी स्थानिक नगरसेवक संजय वाघुले यांनी या मुजोर चालकांविरोधात एकदिवसीय आंदोलन केले होते. त्यानंतरही स्थिती जैसे थे असल्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

पोलिसांच्या ट्विटर खात्यावरही या ढिसाळ कारभाराचे नागरिकांकडून वाभाडे काढले जात आहेत. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी ‘आम्ही वाहतूक व्यवस्था सर्वाधिक मजबूत करू’ असे सांगितले होते. मात्र ट्विटरवर नागरिकांच्या तक्रारी पाहून अद्यापही वाहतूक व्यवस्थेत सुधारणा झाल्याची चिन्हे नाहीत.

पोलीस गायब

उपायुक्त अमित काळे यांनी दोन-अडीच महिन्यांपूर्वी सॅटिसखाली रिक्षाचालकांवर वचक रहावा म्हणून एक पोलीस अधिकारी आणि तीन पोलीस कर्मचारी नेमले जातील, अशी घोषणा केली होती. प्रत्यक्षात तसे झालले नाही. या संदर्भात ठाणेनगर वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास सांगितले जाईल, असे साहाय्यक पोलीस आयुक्त अनिल संकपाळ यांनी सांगितले.

वाहतूक पोलिसांचा रिक्षाचालकांवर वचक उरलेला नाही. अनेकदा वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या देखत प्रवाशांना लुटले जाते. मात्र, तरीही रिक्षाचालकांवर कारवाई होत नाही

– शैलेश दिवेकर, प्रवासी