मध्य रेल्वेवरील लोकलगाडय़ा रखडण्याचे कारण बनणारे दिवा स्थानकाजवळील रेल्वेफाटक प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनू लागले आहे. गेल्या १५ दिवसांत या फाटकातून रूळ ओलांडताना पाच अपघात झाले असून त्यामध्ये चार जणांना जीव गमवावा लागला असून एक जण गंभीर जखमी आहे. प्रवाशांची सतत वर्दळ असलेल्या या फाटकातील अपघात रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, असा प्रश्न आता लोहमार्ग पोलिसांना पडला आहे.

दिवा हे मध्य रेल्वेवरील गजबजलेले स्थानक आहे. दररोज सकाळी-संध्याकाळी या स्थानकातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते. दिवा परिसरात राहणारे बहुतांश प्रवासी रूळ ओलांडण्यासाठी फाटकातून ये-जा करतात. मात्र, या फाटकात सातत्याने अपघात होत असतात. जुलै महिन्यात या फाटकात पाच अपघातांच्या घटना घडल्या.

७ जुलैला एक  युवक कामावरून घरी जात असताना त्याला लोकलचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला. ६ जुलैला रात्री ८ वाजता चंद्रकांत घाग (६७) यांचाही लोकलच्या धकडेत मृत्यू झाला. १६ जुलैला दिवा येथे राहणाऱ्या बहिणीला भेटण्यासाठी आलेल्या २६ वर्षीय राखी सदर या तरुणीला जलद लोकलचा धक्का लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. १७ जुलैला सकाळी ११.३० वाजता कामावर निघालेल्या गणेश अभंग (३४) याला लोकलचा धक्का लागल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर, गुरुवारी रात्री ८.४५ वाजता रेल्वे रूळ ओलांडताना लागलेल्या गाडीच्या धक्क्य़ाने तिलक प्रसाद (२६) या तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. या समस्येविषयी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

चेंगराचेंगरीची भीती

दिवा रेल्वे स्थानकातील प्रवशांची संख्या लाखोंच्या घरात असून त्यातील सर्वाधिक प्रवासी हे दिवा पूर्वेत राहतात. पादचारी पूल अपुरा पडत असल्याने प्रवासी फाटकातून रेल्वे रूळ ओलांडतात. रूळ ओलांडणे धोक्याचे असल्याने काही दिवसांपूर्वी रेल्वे पोलिसांतर्फे प्रवाशांना रूळ ओलांडणे अर्धा तास बंद करण्यात आले होते. मात्र, फाटक बंद केल्यामुळे मुंबईच्या दिशेला असणाऱ्या पादचारी पुलावर गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती.

दिवा रेल्वे स्थानकात रूळ ओलांडताना सातत्याने अपघात होत आहेत. स्थानकाच्या जवळ असलेल्या सिग्नल चौकीमुळे गाडीचा अंदाज येत नसल्याने हे अपघात होत आहेत. सातत्याने होणाऱ्या अपघातांवर उपाय योजना करावी यासाठी लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलासोबत पत्रव्यवहार सुरू आहे.

– नितीन चव्हाण, दिवा रेल्वे प्रवासी संघटना