News Flash

तरुणाईची ‘वायफाय’ स्थानके

बोरिवली स्थानकावर गेमिंग झोन

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबई आणि उपनगरातील काही स्थानकांवर मोफत वायफाय सेवा सुरू करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची चांदीच केली आहे. सध्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाइल आणि त्यातही इंटरनेटशिवाय विद्यार्थ्यांचे पान हलत नाही. अगदी अभ्यास करण्यासाठी पाठय़पुस्तकांपेक्षा विषयांच्या नोट्स इंटरनेटवर शोधले जातात. त्यामुळे अगदी विषय शोधण्यापासून, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपच्या वापरासाठी इंटरनेटची गरज असते. घराच्या शेजारील दादाच्या वायफायवर किंवा महाविद्यालयात फोरजी पॅक असलेल्या मित्राला हॉटस्पॉट सुरू करण्याची विनंती करण्यापेक्षा स्थानकांवर चोवीस तास वायफाय सेवा घेणाऱ्या तरुणांमध्ये कमालीची वाढ होत आहे. यात प्रामुख्याने चर्चगेट, वांद्रे, दादर, छत्रपती शिवाजी टर्मिनस, ठाणे येथे रेल्वेच्या वायफाय सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. २२ ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या वायफाय सेवेला दर आठवडय़ाला नवीन पाच वापरकर्ते सहभागी होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. सध्या छत्रपती शिवाजी टर्मिनस, ठाणे, कल्याण, दादर, कुर्ला, वांद्रे, खार, दादर, मुंबई सेंट्रल, अंधेरी, बोरिवली, विरार या स्थानकांवर मोफत वायफाय सेवा सुरू आहे. त्यापैकी चर्चगेट, वांद्रे, दादर या स्थानकांवर वायफायचा आनंद घेण्यासाठी तरुणांचा घोळका तासनतास रेंगाळताना दिसत आहे.

 

बोरिवली स्थानकावर गेमिंग झोन

पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकावर महाविद्यालयीन विद्यार्थी मोबाइलवर खेळ खेळत किंवा गाणी डाऊनलोड करीत असताना पाहायला मिळतात. या स्थानकाजवळ ठाकूर महाविद्यालय, निर्मला महाविद्यालय, केईएस, निरंजना मेजेटिया, एमपीव्ही वालिया, गोखले महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांना बोरिवली स्थानक जवळ आहे. मुले अनेकदा महाविद्यालयात तास नसल्यावर इतर ठिकाणी वेळ घालवण्याऐवजी बोरिवली स्थानकावर येऊन वायफायचा वापर करतात. यामध्ये नवीन खेळ डाऊनलोड करणे, अ‍ॅप ऑटो अपडेट करणे, गाणी किंवा इतर ऑडिओ डाऊनलोड करणे अशा अनेक गोष्टी स्थानकावरील वायफायच्या साहाय्याने करतात. मात्र येथे मोठय़ा प्रमाणात गेम डाऊनलोड केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. दर वेळेस नवा खेळ डाऊनलोड करून त्याचा आनंद घेतला जातो. इंटरनेट जगभरातील नवीन गोष्टी शिकण्याचे व्यासपीठ आहे. त्यामुळे आम्ही आतापर्यंत अनेक खेळ, चित्रपट आणि व्हिडीओ डाऊन लोड केले आहेत. मोबाइल खेळांमध्ये पॉकिमॉनपासून कार रेसिंग अशा अनेक खेळांचा समावेश आहे, असे ठाकूर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. गेमबरोबरच एखाद्या विषयाचे नोट्स साठवून ठेवाण्यासाठीही याचा उपयोग केला जातो. महाविद्यालयात तास सुरू होण्याच्या काही काळ आधी किंवा तास संपल्यावर काही वेळ स्थानकावर थांबून आपल्याला हवे त्या नोट्स सेव्ह करून घेतल्या जातात आणि लोकलमध्ये बसल्यावर त्याचा अभ्यास करतात. महिन्यात मोबाइलसाठी मिळणारी पॉकेटमनी संपल्यावर मात्र या वायफायचा मुलांना आधार वाटतो. अनेक मोबाइलप्रेमी मुले नवनवीन अ‍ॅप डाऊनलोड करतात आणि अ‍ॅपची सर्वाकष माहिती करून घेतात.

 

यू टय़ूब चर्चगेट

चर्चगेट स्थानकाच्या जवळ हाकेच्या अंतरावर विधि महाविद्यालय, सिडनहॅम महाविद्यालय असल्यामुळे येथे महाविद्यालयीन मुलांचा घोळका इंटरनेटचा वापर करताना दिसतो. चर्चगेट स्थानकावर बाकावर बसून किंवा स्थानकाबाहेरच्या कठडय़ावर बसून तर व्हेज कटलेट पाव खात किंवा कॉफीचा आस्वाद घेत व्हिडीओ पाहिल्या जातात. अगदी चित्रपटांतील गाणी, प्राण्यांचे व्हिडीओ, विनोदी व्हिडीओ पाहण्याची क्रेझ अधिक आहे. चर्चगेट येथे राहणारा आणि माटुंग्याच्या रूपारेल महाविद्यालयात शिक्षण घेणारा विवेक पाटील महाविद्यालयात येण्यापूर्वी चर्चगेट स्थानकावर थांबून महाविद्यालयीन प्रकल्पाचे काम करतो. अनेकदा मुंबई सेंट्रलवरील स्थानकावर बसण्याची चांगली सोय असते त्यामुळे तेथे जाऊन इंटरनेटचा वापर करीत असल्याचे विवेक याने सांगितले.

 

अपडेट अ‍ॅट दादर स्थानक

दादर स्थानक हे मुंबईचे केंद्रबिंदू मानले जाते. तसे पाहता दादरमधील कपडय़ांची दुकाने, भाजी, फुले यांचा बाजार असल्यामुळे येथे कायम मोठी आर्थिक उलाढाल होत असते. मात्र २२ ऑगस्टपासून येथे मोठय़ा प्रमाणात तांत्रिक उलाढालही होऊ लागली आहे. दादरच्या फलाट क्रमांक दोन आणि चारवर इंटरनेटचा मोठय़ा प्रमाणात वापर होताना दिसत आहे. या इंटरनेटला २२ एमबीपीएस इतका वेग असल्यामुळे फलाटभर मिळणाऱ्या मोफत इंटरनेटमुळे मुले समाज माध्यमांवर वेळ घालवीत आहेत. इंटरनेटचा स्पीड चांगला असल्यामुळे फेसबुकवर फोटो पटापट अपडेट होतात. तर मोबाइल आणि अ‍ॅप्लिकेशन अपडेट करण्यासाठी या इंटरनेटचा वापर केला जातो. अनेक मुले दादर स्थानकावर उतरून मोबाइल अपडेट करून पुढील कामाला लागतात असे मुंबई विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या अमित जाधव याने सांगितले. मात्र आपण नोंदणी केल्याच्या अध्र्या तासापर्यंत या इंटरनेटचा वापर केला जाऊ शकतो असे त्याने सांगितले. त्यामुळे अनेक विद्यार्थी अर्धा तास पूर्ण झाल्यावर दुसऱ्या स्थानकावरील इंटरनेटच्या शोधात निघतात. तेजश्री शिंदे ही रजना संसद महाविद्यालयाची विद्यार्थिनी दादरच्या वायफायचा वापर करते. महाविद्यालयात दररोज वेगवेगळे प्रकल्प दिले जातात. यासाठी बहुतांश वेळा इंटरनेटची गरज असते त्यामुळे स्थानकांवर मोफत इंटरनेट मिळाल्यामुळे अनेक प्रकल्पांसाठी लागणारी माहिती आणि व्हिडीओ येथे पाहता येतात असे तेजश्री हिने सांगितले.

 

लोकलच्या प्रतीक्षेला नेट

मध्य रेल्वेची वाहतूक ही कायमच रखडलेली असते. अशा वेळी स्थानकांवर वेळ घालविण्यासाठी प्रवाशांना त्यातही तरुणांना मोफत इंटरनेटचा आधार मिळाला आहे. कल्याण हे जंक्शन असल्यामुळे येथे गर्दीचे साम्राज्य असते. कुठलीही लोकल कुठल्याही फलाटावर येण्याची शक्यता असल्यामुळे प्रवासी स्थानकांवर उभे राहण्यापेक्षा रेल्वे पुलावर लोकल येण्याची वाट पाहत असतात. त्यामुळे रिकाम्या वेळेत प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाते. बऱ्याचदा चित्रपट डाऊनलोड करणे किंवा यू टय़ुबवर व्हिडीओ पाहण्यासाठीही या इंटरनेटचा वापर केला जातो. विद्याविहार येथील सोमय्या महाविद्यालयात शिकणारा आदित्य गरुड कल्याण स्थानकावरील इंटरनेटचा वापर करतो. मागील महिन्यात इंटरनेट सुरू झाल्यापासून अनेक चित्रपट डाऊनलोड केले असल्याचे त्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2016 2:36 am

Web Title: free wifi hotspot at mumbai
Next Stories
1 नवउद्यमासाठी ग्राहकाभिमुखता हवी
2 लौकर यावे सिद्ध गणेशा..
3 ..हे तर मुस्लीमद्वेषी राजकारण
Just Now!
X