गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य, फुले खरेदीसाठी झुंबड

भक्तांची विघ्ने दूर करून सर्वत्र सुखसमृद्धी निर्माण करणाऱ्या गणरायाच्या आगमनाच्या आधीचा दिवस बाजारात नवचैतन्य निर्माण करून गेला. नोटाबंदी, जीएसटी यामुळे गेल्या काही दिवसांपासून मंदीचे चटके सोसत असलेल्या बाजारात गुरुवारी गणेशोत्सवानिमित्तच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. सजावटीची मखरे, रंगबिरंगी मण्यांच्या माळा, गणरायाची आभूषणे यांनी सजलेल्या बाजारात फुलांचा दरवळ वातावरण भारून टाकत होता. त्यातच गणेशमूर्ती नेण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची सुरू असलेली घाई आणि त्यांच्या वाद्यांचा गजर यांनी बुधवारी ठाण्यासह विविध शहरांतील वातावरण मंगलमय केले होते.

गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी जवळपास सर्वच बाजारपेठा ग्राहकांनी फुलल्या होत्या. पुजेच्या साहित्यासह सजावट, प्रसाद, फळे आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांनी एकच गर्दी केली होती. यंदा शुक्रवारी गणराय विराजमान होणार असल्याने सलग तीन दिवसांची सुटी नोकरदार वर्गाला मिळणार आहे. यामुळे गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सर्व शहरांतील प्रमुख बाजारपेठांमध्ये गजबज पाहायला मिळाली. जीएसटी लागू झाल्यामुळे गणेशोत्सवामध्ये लागणाऱ्या अनेक साहित्याच्या किमतींत वाढ झाली असली तरी, गणरायाच्या स्वागत आणि आराधनेत कोणतीही कसूर राहू नये, यासाठी ग्राहकांनी हात आखडता घेतला नसल्याचे दिसून आले.

गणेशोत्सव जवळ येऊ लागल्यावर जांभळीनाका, टेंभीनाका परिसरात खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असते. जांभळीनाका परिसराचा अरुंद रस्ता नागरिकांना खरेदीसाठी अडथळा ठरू नये यासाठी जांभळीनाका ते रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता गुरुवारी बंद करण्यात आला होता. या अंतर्गत रस्त्यावरील वाहतूक चिंतामणी चौक परिसरातून स्थानक परिसराकडे वळवण्यात आली होती. शहराचे अंतर्गत भाग असलेल्या किसननगर, वर्तकनगर, लोकमान्यनगर या परिसरातदेखील फुले, भाज्या, पूजा साहित्य विकणाऱ्या विक्रेत्यांनी बाजारपेठा फुलल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती आणण्यासाठी गुरुवारीच मूर्तिकारांकडे गर्दी झाल्याने सकाळी आणि सायंकाळी काही भागात वाहतूककोंडी  होती.

फुले महागली

गणरायाच्या पूजेसाठी लागणारी फुले चढय़ा दरात विकण्यात येत होती. १० रुपयाला मिळणारी फुलपुडी गुरुवारी २० रुपये दराने विकण्यात येत होती. तसेच शुक्रवारी फुलपुडीचे दर ४० रुपये होईल, असा अंदाज फुलविक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. शेवंती ४०० रुपये किलो असून आज हे भाव ५०० रुपये किलो होतील, असे  फुलविक्रेते सोपान काळे यांनी सांगितले.