८२४ पैकी केवळ ९८ मंडळांकडे अग्निसुरक्षा दाखला

वसईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अग्निसुरक्षेबाबत कमालीचा हलगर्जीपणा दाखवला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला घेणे बंधनकारक असला तरी शहरातील ८२४ पैकी केवळ ९८ मंडळांनी अग्निसुरक्षा तपासणी करून अग्निशमन दाखला घेतला आहे.

वसई विरार शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अग्निसुरक्षेबाबत उदासीन असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. शहरात एकूण ८२४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. मात्र त्यापैकी केवळ ९८ मंडळांनीच अग्निसुरक्षा तपासणी करून अग्निशमन दलाचा दाखला घेतला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस आणि महापालिकेची परवानगी आवश्यक असते. या परवानग्या घेतल्यानंतर अग्निसुरक्षेसाठी अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला आवश्यक असतो. पालिकेकडून परवानगी मिळाल्यानंतर अग्निशमन विभागाकडे अर्ज केला जातो. त्यानंतर अग्निशमन दलाचे अधिकारी मंडपाची तपासणी करतात. वीजजोडण्या सुरक्षित आहेत का? मंडपात अग्निरोधक यंत्रणा आहेत की नाही, आग लागल्यास तत्काळ बाहेर पडण्याचे सुरक्षित मार्ग आहेत का, मंडपाच्या आवारात ज्वलनशील पदार्थ आहेत का ते तपासले जाते. मंडप आणि परिसराला आगीचा धोका नाही आणि आग लागल्यानंतर ती विझविण्याच्या यंत्रणा आहेत हे तपासल्यानंतर अग्निशमन दलाकडून ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते.

अग्निशमनल दलाचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा दाखला असूनही सार्वजनिक मंडळांनी त्याबाबत उदासीनता दाखवली आहे. आमच्याकडे ९८ अर्ज आले होते. आम्ही त्यांची तपासणी करून त्यांना ना हरकत दाखला दिला.

-दिलीप पालव, मुख्य अग्निशमन अधिकारी, वसई-विरार महापालिका

सार्वजनिक मंडळांना अग्निसुरक्षा दाखला मिळावा यासाठी आम्ही विशेष व्यवस्था केली होती, तसेच सर्व मंडळांना हा दाखला काढून घ्या, असे वेळोवेळी आवाहन केले होते.

-रमेश मनाळे, अतिरिक्त आयुक्त