घाऊक बाजारातील १०० रुपये किलो, तर किरकोळ बाजारात २०० रुपयांचा भाव

मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या उपनगरांना भाजीपाल्याचा पुरवठा करणाऱ्या वाशीतील आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील काही दिवसांपासून भाज्यांची आवक कमालीची घटल्याने दर झपाटय़ाने वाढू लागले आहेत. या भाववाढीचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसत असताना फोडणीसाठी वापरल्या जाणाऱ्या लसणाच्या दरांनी घाऊक बाजारात शंभरी गाठली असून किरकोळ बाजारात ते २०० रुपयांच्या घरात पोहोचले आहेत.

गेल्या काही महिन्यांमध्ये दुष्काळाच्या झळा बसू लागल्याने टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, वांगी, भेंडी यांसारख्या भाज्यांचे भाव दुपटीने वाढले आहेत. किरकोळीत या भाज्यांचे दर ६० ते ८० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.  त्यातच आता लसणाची भर पडली आहे. दुष्काळामुळे महाराष्ट्रातील पुणे तसेच नाशिक जिल्ह्य़ातून होणारी लसणाची आयात रोडावली आहे. मुंबई तसेच ठाणे परिसरात मध्य प्रदेशातील काही भागांमधून लसणाचा पुरवठा सुरू आहे. मध्य प्रदेशातील लसणाच्या आयातीवर मोठा खर्च होत आहे. त्यामुळे किमती वाढल्या आहेत. मध्य प्रदेशातून लसणाची होणारी आवक तुलनेने कमीच आहे.  मुंबई, ठाण्यात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने दर वाढू लागले आहेत, अशी माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शमाकांत चौधरी यांनी दिली.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरांत दररोज किमान ६ गाडी लसूण लागतो. गेल्या काही दिवसांपासून हे प्रमाण जेमतेम ३ ते ४ गाडय़ांवर आले आहे. महाराष्ट्रातून होणारी आवक जवळपास बंद झाली आहे. त्यामुळे लसणाचे दर आणखी वाढण्याची भीती आहे.