ठाकुर्ली येथील मातृकृपा ही धोकादायक इमारत कोसळून नऊ रहिवासी मृत्युमुखी पडले. यामुळे शहरातील ६८६ धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या धोकादायक इमारतींच्या बाबतीत पालिकेने धोरणात्मक निर्णय घेऊन एक अहवाल शासनाला पाठवावा, या मागणीसाठी आता विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करावी, अशी मागणी काँग्रेससह सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी केली आहे.
धोकादायक इमारत कोसळली की त्यानंतर काही दिवस या विषयी चर्चा केली जाते. त्यानंतर हा विषय गुलदस्त्यात जातो. शहरात ६८६ धोकादायक इमारती आहेत. या इमारतींची यापुढील काळात पडझड होण्याची भीती आहे. घटना घडेल तेव्हा या गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावर बोलण्यापेक्षा अगोदरच पालिकेने या धोकादायक इमारतींबाबत धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे, असे विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे यांनी म्हटले आहे. धोकादायक इमारतींचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी मुंबईप्रमाणे इमारत दुरुस्ती महामंडळ, प्राधिकरण शासनाने स्थापन करावे. या इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी पर्यायी व्यवस्था, संक्रमण शिबिरे, रात्र निवारा केंद्र यांची सुयोग्य व्यवस्था करणे गरजेचे आहे.