लोकसत्ता खास प्रतिनिधी
ठाणे : घोडबंदर येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मार्गिका आधीच मेट्रोच्या कामामुळे अरुंद झाल्या असतानाच, त्यापाठोपाठ सेवा रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे या भागात सातत्याने निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता ठोस पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मानपाडा ते नागलाबंदपर्यंतच्या सेवा रस्त्यांना डांबराचा मुलामा देऊन त्यांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. उच्चप्रतीच्या डांबराचा वापर करून येत्या मे महिनाअखेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
घोडबंदर परिसराचे गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने नागरीकरण झाले आहे. त्याचबरोबर या भागात वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. या भागातील वाहतुकीसाठी मुंबई-अहमदाबाद हा एकमेव महामार्ग आहे. हा मार्ग मेट्रोच्या कामामुळे अरुंद झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. असे असतानाच सेवा रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सेवा रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत महापालिकेच्या कारभारावर सातत्याने टीका होत आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सेवा रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सेवा रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामास सुरुवात केली आहे.
मुल्लाबाग ते नागला बंदर असे दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांचे काम करण्यात येणार आहे. मलवाहिनी आणि जलवाहिनी टाकण्याच्या कामांमुळे हा रस्ता उंच सखल झाला असून त्याचे सपाटीकरण करण्यात येणार आहे. २०१२ मध्ये कॅडबरी सेवा रस्ते तयार करण्यासाठी उच्चप्रतीचे डांबर वापरण्यात आले होते. ते रस्ते अजूनही सुस्थितीत आहेत.
त्यामुळेच याच प्रकारातील डांबर घोडबंदर सेवा रस्त्यांच्या कामासाठी वापरण्यात येणार आहे. दोन्ही बाजूच्या एकूण १४ किमीच्या कामांसाठी २३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती महापालिका नगरअभियंता रवींद्र खडताळे यांनी दिली.