पुन्हा खड्डा खणून तलाव दाखविण्याचा घाट

मयूर ठाकूर, लोकसत्ता

भाईंदर : घोडबंदर येथील वर्सोवा गावातील बेपत्ता झालेला तलाव शोधण्यासाठी आता शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. येथील ग्रामस्थांच्या वापराचा तलाव बुजवून तो नष्ट करण्यात आला होता. याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर शासकीय यंत्रणांची धावपळ उडाली आहे. विशेष म्हणजे संबंधित हॉटेल व्यावसायिकाने भराव केलेल्या ठिकाणी पुन्हा उत्खनन करून तलाव दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

घोडबंदर येथील वर्सोवे गावात भूमापन क्रमांक ९० मधील आठ गुंठे जागा ही सार्वजनिक तलावाकरिता असल्याची नोंद महसूल विभागाकडे आहे. त्याचप्रमाणे स्थानिक ग्रामस्थ आणि आदिवासी या तलावाचा वापर अनेक वर्षांपासून करत होते. परंतु गेल्या चार वर्षांपासून हा तलाव अचानक गायब झाला. या ठिकाणी मातीभराव करून मैदान करण्यात आले होते. या संदर्भात २०१६ पासून ग्रामस्थ  प्रशासनाकडे तक्रार करत होते. इतकेच नाही तर २०१९ रोजी काशिमिरा पोलीस ठाण्यात चक्क तलाव चोरीला गेल्याची तक्रार करण्यात आली. या तलावाला लागूनच ‘सी एन रॉक’ या नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमालकाने या जागेवर कब्जा करण्यासाठी या परिसरात अनेक ठिकणी मातीभराव करून तलाव नष्ट केल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. या ठिकाणी असलेला तलाव चोरीला गेल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली होती. पण या प्रकरणी शासकीय यंत्रणा वेळकाढू धोरण अंगीकारून ग्रामस्थांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवत होते. ‘लोकसत्ता वसई-विरार’मध्ये १३ फेब्रुवारी रोजी याबाबत वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.

या बातमीची दखल घेत शासकीय यंत्रणा तलाव शोधण्याच्या कामाला लागली आहेत. एवढेच नव्हे तर संबंधित ठिकाणी रविवारी अज्ञात व्यक्तींकडून उत्खनन करून तलाव तयार निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तलाव चोरल्याचे उघडकीस येऊ  नये म्हणून पुन्हा खोदकाम करून तलाव असल्याचे भासविण्याचा हा खटाटोप असल्याच आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. हे हॉटेल माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या निकटवर्तीयांचे असल्याचा आरोप आहे. मात्र त्यानी आरोप फेटाळले आहेत. या हॉटेलचा आणि माझा काही संबंध नाही, या ठिकाणी खड्डा होता. तो शेतकऱ्यांनी बुजवला होता, असे त्यांनी सांगितले.

या ठिकाणी जमिनीच्या सातबाऱ्यात तलाव असल्याचे दिसून येत आहे. गुगल नकाशावरून तलाव असल्याचे समजत आहे. यामुळे आम्ही या विभागाचा पंचनामा करून वरिष्ठांना पाठवला आहे. लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल.

– अभिजित बोडके, तलाठी, घोडबंदर

तलावाचे नेमके स्थान कुठे आहे या संदर्भात भूमी अभिलेख विभागाचा अहवाल आल्यानंतर समोर येईल. यासाठी आम्ही लवकरच भूमिअभिलेख विभागाचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. तसेच सध्या या भागात सुरू असलेले उत्खनन कुणी केले यासंदर्भात माहिती घेतली जात आहे. याप्रकरणी सर्व अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल. 

– दीपक अनारे, मंडल अधिकारी