कल्याणमधील पत्रीपूल ते दुर्गाडी किल्ल्याचा परिसर जोडणारा गोविंदवाडी बाहय़वळण रस्ता मेअखेपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे हे प्रशासनाचे लक्ष्य आहे, अशी माहिती कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
तीन महिन्यांपूर्वी गोविंदवाडी येथील तबेला हटविण्याचे काम घाईने करण्यात आले. तेथील रस्त्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले तरी रस्ता अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहनचालक तसेच प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे. गोविंदवाडी रस्त्याच्या दुतर्फा गटारे उभारणे तसेच तेथील उच्च दाबाच्या वीजवाहिन्या जमिनीखालून टाकणे, विजेचे जुने खांब काढून टाकणे ही महत्त्वाची काम सध्या प्रगतिपथावर आहेत. या भागात कबरस्तान आहे. त्याच्या बाजूला संरक्षित भिंत बांधण्याची महत्त्वाची कामे हाती घेण्यात आली आहेत.
एका तबेला मालकाने रस्त्यालगत असलेला तबेला हटविण्यास नकार दिल्याने पाच वर्षांपासून गोविंदवाडी रस्त्याचे काम रखडले होते. या वेळी प्रशासनाने तबेला मालकाशी चर्चा करून त्याच्या मागण्या पूर्ण केल्याने त्याने रस्त्यासाठी तबेल्याची जागा देण्याची तयारी दर्शवली. गोविंदवाडी रस्तामुळे शिवाजी चौक, सहजानंद, लालचौकीमार्गे जी वाहने दुर्गाडी पूल ते पत्रीपूल असा प्रवास करतात ती बहुतांशी वाहने गोविंदवाडी बाहय़वळण रस्त्याने शहराबाहेरून निघून जातील. त्यामुळे कल्याणमधील कोंडी कमी होणार आहे.