कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत नव्या बांधकामांना घालण्यात आलेली बंदी अखेर सोमवारी मुंबई हायकोर्टाने उठवली. शहरातील कचरा विल्हेवाटासंबंधी प्रशासन ठोस निर्णय घेत नसल्याने वर्षभरापूर्वी हायकोर्टाने कल्याण डोंबिवलीत नवीन बांधकामांना बंदी घातली होती. महापालिका हद्दीत घालण्यात आलेल्या बांधकाम बंदीमुळे मागील वर्षभरात शहरातील सर्व नवीन बांधकाम प्रकल्प ठप्प पडले होते. मात्र, हायकोर्टाने आज बंदी उठविण्याचा निर्णय घेतल्याने बांधकाम क्षेत्रावर आलेली मरगळ दूर होण्याची शक्यता आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे डम्पिंग ग्राऊंड नसल्याने शहरातील बांधकामांवर बंदी लादण्यात आली होती. सोमवारी झालेल्या सुनावणीत डम्पिंग ग्राऊंडच्या प्रश्नावर समाधानकारक पावले उचलल्याचे कडोंमपा महापालिकेने प्रतिज्ञापत्रात मांडल्याने हायकोर्टाने बंदी उठविण्याचा निर्णय दिला. मात्र, आगामी काळात कचऱयाच्या विल्हेवाटासंदर्भात नियमांची पूर्तता झाली नाही किंवा आवश्यक ती पावले उचलली जात नसल्याचे दिसून आल्यास बांधकाम बंदी पुन्हा लागू करण्यात येईल, असेही न्यायालयाने ठणकावले आहे.