‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ परिसंवादात मान्यवरांचा सल्ला

धावपळीची जीवनशैली, अतिरेकी स्पर्धा, त्यातून निर्माण होणारे ताणतणाव, चुकीचा आणि अवेळी घेतला जाणारा आहार यामुळे आरोग्याच्या विविध समस्या भेडसावत असून बिघडलेली ही दिनचर्या सुधारणे, हीच आरोग्यपूर्ण जीवनाची गुरुकिल्ली आहे, असा सल्ला शुक्रवारी माधवबाग प्रस्तुत ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ उपक्रमात झालेल्या परिसंवादात वैद्यांनी दिला.
‘तन्वी शता’ या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत.
वैद्य शैलेश नाडकर्णी, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशीष देशपांडे आणि मधुमेह-रक्तदाबाविषयी जनजागृती मोहीम सुरू करणारे डॉ. राजेंद्र आगरकर यांनी तीन स्वतंत्र सत्रांमध्ये आरोग्य बिघडण्याची विविध कारणे आणि त्यांच्या उपायांचा ऊहापोह केला.

सकारात्मक दृष्टीची गरज – डॉ. आशीष देशपांडे

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशीष देशपांडे यांनी दुसऱ्या सत्रात ताणतणाव, भीती व शल्य या मानसिक समस्या आणि त्यांचे व्यवस्थापन याविषयी मोलाची माहिती दिली. ताणतणाव हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक आहे. ते जिवंतपणाचे लक्षण आहे. ताणतणाव नसणारी व्यक्ती मृत आहे, असे समजण्यास हरकत नाही. मुळात मन आणि शरीर या दोन भिन्न गोष्टी नाहीत. अनेक शारीरिक आजारांमध्ये मानसिक अस्वास्थ्याची लक्षणे दिसतात. ती आपण मान्यही करतो. मात्र मानसिक आजारपणातही शारीरिक दुखणी उद्भवू शकतात, हे आपण अजूनही मान्य करीत नाही. प्रयत्नातले सातत्य आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतीही व्यक्ती मानसिक नैराश्यावर मात करू शकते. मात्र वाढत्या ताणतणावांचा गांभीर्याने विचार करण्याची आता वेळ आली आहे. देव आहे की नाही, याची चर्चा करण्यात वेळ घालविण्यापेक्षा जे जे ‘गुड’ ते ‘गॉड’ मानण्यास काहीच हरकत नाही. अशा प्रकारच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आपले जीवन अधिक आनंदी होईल, असा विश्वास डॉ.आशीष देशपांडे यांनी व्यक्त केला.

आहाराचा प्रभाव मोठा – वैद्य शैलेश नाडकर्णी
आयुर्वेदात प्रकृतीगणिक उपचार पद्धत सुचविण्यात आली आहे. वात, पित्त आणि कफ प्रकृती धर्माच्या लोकांनी काय खावे आणि काय खाऊ नये हे आयुर्वेदात सांगण्यात आले आहे. प्रत्येक पदार्थाचे बरे-वाईट गुणधर्म असतात आणि त्याचे शरीरावर बरे-वाईट परिणाम होतात. कोणता पदार्थ किती आणि कधी खावा, यावरही आरोग्य अवलंबून असते. सर्व पदार्थाचे पचन व्यवस्थित झाले की आरोग्य चांगले राहते, अगदी पाणीसुद्धा पचवावे लागते. विविध रसयुक्त आहार प्रकृतीला पोषक असतो. त्यामुळे सातत्याने एकच एक पदार्थ सेवन करण्याऐवजी आहारामध्ये मधुर, आंबट, तिखट, तुरट तसेच कडू आदी विविध रसांचा अंतर्भाव असावा. शिजवणे, भिजवणे, वाफवणे, भाजणे, तळणे, उन्हात सुकविणे आदी संस्कार केल्याने पदार्थाचे गुणधर्म बदलता येतात. दही हा आरोग्यपूर्ण आहार नसला तरी ते घुसळून केलेले ताक निश्चितच आरोग्यदायी असते, असे मार्गदर्शन वैद्य शैलेश नाडकर्णी यांनी ‘आहारातून आरोग्य’ या व्याख्यानातून केले.
प्रतिबंधात्मक उपायांची आवश्यकता – डॉ. राजेंद्र आगरकर
गेल्या १५ वर्षांत मधुमेह आणि उच्च रक्तदाब या व्याधींनी ग्रस्त रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे भाकित खोटे ठरवत २०१४ मध्येच भारतात मधुमेह रुग्णांची संख्या ६ कोटी ६५ लाख इतकी प्रचंड झाली आहे. भारतातील निम्म्या रुग्णांना आपल्याला रक्तदाब आहे, हेच ठाऊक नाही. ठाऊक असणाऱ्यांपैकी ५० टक्के डॉक्टरांकडे जात नाहीत. डॉक्टरांकडे जाऊनही नियमित औषधोपचार घेणाऱ्यांचे प्रमाणही जेमतेम निम्मेच आह. अवघे साडेबारा टक्के रुग्ण रक्तदाब नियंत्रित ठेवण्याकाठी नियमित औषधे घेतात. भारतातील ६५ टक्के जनता तरुण म्हणजे पस्तिशीच्या आतील आहे. उर्वरित ३५ टक्क्य़ांमध्ये रक्तदाब आणि मधुमेह रुग्ण आहेत. मात्र आता तरुण वयातही मधुमेह तसेच रक्तदाबाची समस्या आढळते. मध्यंतरी लोहाचे प्रमाण अधिक असल्याने एका कंपनीच्या नूडल्सवर देशात बंदी घालण्यात आली. मात्र लोहाप्रमाणेच प्रचलित आहारातील इतर अन्य घटकही आरोग्यास घातक आहेत. मैद्यापासून बनविला जाणारा ब्रेड, बिस्किटे, पिझ्झा, बर्गर तसेच वडापाव, शीतपेये, धूम्रपान, मद्य आदी पदार्थ आपल्या आयुष्यातून हद्दपार करावेत. त्यासाठी सरकारी बंदीची वाट पाहू नये. रक्तदाब आणि मधुमेह आजार पूर्णपणे बरे होतील, असे कोणतेही औषध सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपायच करावे लागतील, असे प्रतिपादन डॉ. राजेंद्र आगरकर यांनी केले. ‘सोसायटी फॉर प्रिव्हेशन ऑफ हायपरटेन्शन अ‍ॅण्ड डायबेटिस’ या संस्थेच्या माध्यमातून डॉ. आगरकर आणि सहकारी सध्या या दोन व्याधींविषयी जनजागृती करण्याचे कार्य करीत आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी तर सूत्रसंचालन ‘लोकप्रभा’चे कार्यकारी संपादक विनायक परब यांनी केले. पीतांबरी, ज्युपिटर हॉस्पिटल, चैतन्य होमिओ, सीमंधर (यशाका), दातार न्यूट्रासिटिकल्स, डेल्टाज् फार्मा, जी. पी. पारसिक बँक, श्री डेन्टल स्पेशालिटी हॉस्पिटल, हावरे, टीप-टॉप प्लाझा आणि वावीकर आय इन्स्टिटय़ूट यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
ठाण्यात आज पुन्हा आरोग्यमान भव
शुक्रवारी उदंड प्रतिसाद लाभलेला ‘लोकसत्ता
आरोग्यमान भव’ हा आरोग्यविषयक परिसंवाद शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० ते २ या वेळेत टीप-टॉप प्लाझा, लालबहाद्दूर शास्त्री मार्ग, ठाणे (प) येथे होईल.