अतिवृष्टीचा इशारा

भारतीय हवामान विभाग आणि स्कायमेट संस्थेने ९ ते ११ जून या तीन दिवसांच्या काळात अतिवृष्टीचा इशारा दिल्याचा दावा करत ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आपल्या यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेतील प्रमुख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्टय़ाही या काळात रद्द करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी गरज असेल तरच किंवा हवामानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन जयस्वाल यांनी केले आहे.

येत्या ९ ते ११ जून या कालावधीत अतिवृष्टी होण्याचा इशारा स्कायमेट संस्था आणि भारतीय हवामान विभागाने दिला आहे, असे ठाणे महापालिकेचे म्हणणे आहे. या कालावधीत पावसाच्या जोरदार सरी बसणार असून कदाचित २६ जुलै २००५ची परिस्थिती पुन्हा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन त्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले. तसेच ८ जूनपर्यंत सर्व यंत्रणा अद्ययावत करण्याच्या आणि तीन दिवसांच्या काळात कोणत्याही अधिकाऱ्याने मुख्यालय सोडू नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

या तीन दिवसांच्या कालावधीत १८ वरिष्ठ अधिकाऱ्यांना तीन वेळापत्रकात तैनात करण्यात येणार असून त्याचबरोबर सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुटय़ा रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या काळात नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. या कालावधीत आपत्तीचा सामना करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याबरोबरच साहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंते, स्वच्छता निरीक्षक यांनाही देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे  पाळाव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. शहरात ज्या सखल भागात पाणी साचते त्या ठिकाणी लोखंडी खांब टाकून रस्सी बांधण्यात यावी. जेणेकरून एखादी घटना घडून त्या ठिकाणी कोणी अडकले तर त्याला व्यवस्थितपणे सुरक्षितस्थळी हलविता येऊ शकेल.

तसेच वेळ पडल्यास सखल भागातील रहिवाशांचे स्थलांतर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. त्याचबरोबर स्थावर मालमत्ता विभागाने महापालिकेच्या रिकाम्या मालमत्तांचा शोध घ्यावा आणि महापालिका शाळा, लग्नाचे सभागृह आरक्षित करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.