सागर नरेकर

बदलापुरातील पुराची विकासकांनाही धास्ती; घरखरेदीकडे ग्राहक पाठ फिरवण्याची भीती

बदलापूर ‘निसर्गाच्या सान्निध्यात घर’ किंवा ‘नदीकाठचा निवारा’ अशा जाहिराती करून आपल्या गृहप्रकल्पांकडे ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या विकासकांनी गेल्या आठवडय़ातील पुराची चांगलीच धास्ती घेतली आहे. गेल्या शनिवारी उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या बहुतांश प्रकल्पांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या. त्यातच नदीकाठी आखली जाणारी पूररेषा बदलापुरात निश्चित नसल्याने ग्राहक आपल्या गृहप्रकल्पांकडे पाठ फिरवतील, अशी चिंता विकासकांना सतावू लागली आहे.

परवडणाऱ्या घरांच्या शोधात असलेल्या सर्वसामान्यांचा ओढा गेल्या काही वर्षांपासून बदलापूरकडे वाढला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात शहरातून वाहणाऱ्या नदीकिनारी आपल्या हक्काचे घर, अशी जाहिरात करत विकासकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यास सुरुवातही केली आहे. बदलापूर शहरात पश्चिमेतील चौपाटी ते वालिवली पुलापर्यंत ना विकास क्षेत्र रेखांकित करण्यात आले आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी ज्या ठिकाणी हे क्षेत्र रेखांकित नाही अशा ठिकाणी प्रकल्पांची परवानगी घेतली आहे. वालिवली, एरंजाड भागात अनेक ठिकाणी पत्रे ठोकत तशी तयारीही सुरू झाली आहे. मात्र,

गेल्या आठवडय़ात झालेल्या मुसळधार पावसाने उल्हास नदी दुथडी भरून वाहू लागली आणि हे नियोजित प्रकल्प उभे करणाऱ्या विकासकांच्या पोटात गोळा आला आहे.

२६ व २७ जुलै रोजी नदीकिनारी पूरस्थिती निर्माण झाली होती. या परिसरातील अनेक गृहप्रकल्प आठ ते नऊ फूट पाण्याखाली गेले होते. नदीपासून जवळपास १०० मीटरपर्यंत पुराचे पाणी पसरले होते. नियोजित गृहप्रकल्पांची बांधकामे सुरू असलेला वालिवली पुलाजवळचा परिसर दोन दिवस पाण्याखाली होता. ही परिस्थिती पाहून हे गृहप्रकल्प उभारणारे विकासकच धास्तावले आहेत. पुराच्या भीतीने ग्राहक आपल्या गृहप्रकल्पांत घरखरेदीसाठी येणार नाही, अशी चिंता त्यांना सतावू लागली आहे.

पूररेषेचा अभाव

बदलापूर नगरपालिका क्षेत्रात पूररेषा नसल्याची बाब समोर आली आहे. त्यात एका ठरावीक भागातच बांधकामांना बंदी असली तरी वालिवली आणि एरंजाड येथे नदीकिनारी बांधकामे सुरू आहेत. यातील सध्या पूर्ण झालेले किंवा पूर्णत्वाकडे जाणाऱ्या काही गृहप्रकल्पांच्या विकासकांनी आपल्या ताकदीच्या जोरावर वरिष्ठ कार्यालयाकडून सोयीनुसार परवानगी आणल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

नदीच्या क्षेत्रात पूररेषा निश्चित करण्यासाठी नगरपालिकेतर्फे ‘एमएमआरडीए’ला पत्र देण्यात येणार आहे. यात पूर क्षेत्रात बांधकामांना परवानगी देताना तळमजला किंवा पहिला मजला रहिवासी म्हणून वापरावर बंदी किंवा त्यासाठीचा नियम तयार करण्याची विनंती केली जाईल.

–  विवेक गौतम, नगर रचनाकार, कुळगाव बदलापूर नगरपालिका

पूररेषा किंवा पूर आल्यानंतर ज्या भागात पाणी असते अशा ठिकाणी पूर्णत: बांधकाम परवानगी बंद करता येणार नाही. मात्र उच्चतम पूररेषेला ग्राह्य़ धरून बांधकामांना परवानगी द्यायला हवी. तसेच या पूररेषेपर्यंत घरांचे बांधकाम होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.

– जितेंद्र पटेल, सामर्थ्य इंजिनीयर्स ग्रुप