ठाणे रेल्वे स्थानक परिसरात वाहनांची गर्दी; पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणेही कठीण

किन्नरी जाधव, ठाणे</strong>

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रिक्षाचालक आणि खासगी वाहनांच्या बेशिस्तीने प्रचंड गोंधळ उडू लागला असून प्रवासी गर्दीच्या वेळी स्थानकातून बाहेर पडणेही प्रवाशांना कठीण होऊ लागले आहे. रेल्वे स्थानकातून बाहेर पडणारे प्रवासी पटकावण्याच्या प्रयत्नात रिक्षाचालक अधिकृत थांबा सोडून कुठेही रिक्षा उभे करू लागले आहेत. त्यातच खासगी वाहनेही स्थानकाच्या दारापर्यंत येऊन उभी राहू लागली आहेत. विशेष म्हणजे, प्रसारमाध्यमांतून वृत्त येताच स्थानक परिसरात कारवाई करणारी महापालिका आणि पोलिसांचे नियमित लक्ष नसल्याने या बेशिस्तीला धाकच उरलेला नाही.

ठाणे शहरात रिक्षाचालकांच्या बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न नवीन नाही. शहरातील चौकाचौकांत रस्ते अडवून अनधिकृत थांबे तयार करण्यात आले आहेत. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असतानाच आता रेल्वे स्थानक परिसरातील कोंडीने पुन्हा डोके वर काढले आहे. स्थानक परिसरातील अधिकृत रिक्षा थांबा सोडून रिक्षाचालक कुठेही रिक्षा उभ्या करू लागले आहेत. गावदेवी मंदिरापासून ते रेल्वे स्थानकापर्यंतचा पदपथ फेरीवाले आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी व्यापला आहे. तर रस्त्यावर रिक्षांची गर्दी होते. कुठेही उभ्या करण्यात आलेल्या रिक्षांतून वाट काढत प्रवाशांना स्थानकात प्रवेश करावा लागतो.  रिक्षाचालकांकडून बेदरकारपणे रिक्षा चालवण्याच्या प्रकारानेही पादचाऱ्यांना धास्ती वाटू लागली आहे.  सकाळी कार्यालयात वेळेत पोहोचण्यासाठी प्रवाशांची घाई असतेच. अशात रिक्षाचालकांनी वाट अडवल्याने या रस्त्यावरून चालणे कठीण असते. अनेकदा रिक्षाचालक कोणत्याही पद्धतीने रिक्षा चालवीत असल्याने भीतीनेच प्रवास करावा लागतो, असे नियमित प्रवासी सुरेश लोखंडे यांनी सांगितले.

काही महिन्यांपूर्वी रिक्षा वाहतूक सुरळीत व्हावी आणि वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी स्थानक परिसरात रिक्षा, टॅक्सी आणि दुचाकीसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात आली होती. तसेच रिक्षा थांब्याचे नियम मोडून भाडे आकारणाऱ्या चालकांवर कारवाईही करण्यात येत होती.

पूर्वेत सगळा गोंधळ

ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील परिसरातही वाहतूक कोंडी, रिक्षाचालक आणि खासगी बस चालकांच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. ठाण्याच्या विविध भागांतून कोपरीमार्गे या ठिकाणी येणाऱ्या खासगी बसगाडय़ांची संख्या सकाळ-सायंकाळी मोठी असते. या बसच्या वाहतुकीचे काटेकोर नियोजन व्हावे यासाठी वाहतूक पोलिसांचा ताफाही या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. असे असताना एका रेषेत बस चालविण्याचा नियम मोडून संपूर्ण रस्ता व्यापला जात असल्याने स्थानकाच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर वाहनांची मोठी कोंडी होऊ लागल्याचे चित्र आहे. पूर्व भागात रिक्षाचालकांसाठी थांबा असला तरी १० क्रमाकांच्या फलाटाच्या दिशेने वेडय़ावाकडय़ा पद्धतीने उभ्या केल्या जाणाऱ्या रिक्षांमुळे हा संपूर्ण परिसर वाहनकोंडीचे आगार बनला असून पोलिसांकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे चित्र आहे.

रेल्वे स्थानक परिसरात सातत्याने कारवाई सुरूच आहे. गेल्या काही महिन्यांत रेल्वे स्थानकातील कारवाई जास्त प्रमाणात आहे. सकाळीही या परिसरात वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. 

– सुरेश लंभाटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे नगर