वर्षभराच्या मंजुरीनंतरही निविदा नाहीच

पूर्वा साडविलकर, ठाणे</strong>

मातेच्या दुधापासून वंचित राहणाऱ्या नवजात बालकांना दूध मिळावे यासाठी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मातृदुग्ध पेढी हा अभिनव उपक्रम काही वर्षांपूर्वी हाती घेण्यात आला. या उपक्रमास बळ मिळावे आणि दूधसंकलनाचे प्रमाण वाढावे यासाठी महापालिकेमार्फत गेल्या अर्थसंकल्पात यासाठी विशेष वाहन खरेदी करून ते शहरभर फिरविण्याचे जाहीर केले. खुद्द महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही यासाठी आग्रह धरला. प्रत्यक्षात मात्र आर्थिक मंजुरी मिळूनही या वाहनांचा पत्ता नसून यासाठी महापालिकेमार्फत साधी निविदाही काढण्यात आली नसल्याची माहिती पुढे येत आहे.

कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात २०१२ पासून मातृदुग्ध पेढी उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून बाळंतपणानंतर शारीरिक समस्येने स्तनपान देण्यात अडचणी येत असणाऱ्या महिलांच्या नवजात बालकांना मातेचे दूध उपलब्ध करून देण्यात येते. हे दूध रुग्णालयात असलेल्या इतर मातांकडून संकलित करण्यात येते. ठाणे महापालिकेच्या रुग्णालयातील काही डॉक्टरांनी आणि महिला कर्मचाऱ्यांनी अतिशय आग्रहाने हा उपक्रम हाती घेतला आणि यशस्वीदेखील करून दाखविला. अधिकाधिक महिलांनी दूधसंकलनात सहभागी व्हावे आणि शहरातील इतर भागांतील नवजात बालकांपर्यंत दूध पोहोचविता यावे यासाठी सर्व सुविधांनी युक्त असे वाहन खरेदी केले जाईल, अशी घोषणा जयस्वाल यांनी केली होती. महापालिका हद्दच नव्हे तर आसपासच्या शहरांतील काही मातांना या पेढीसाठी दूध उपलब्ध करून द्यायचे असेल तर रुग्णालय व्यवस्थापनाशी संपर्क साधताच घरपोच वाहनाने ते संकलित केले जाईल, अशी व्यवस्था या माध्यमातून उभी करण्याचे ठरविण्यात आले होते.

महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूदही केली गेली. तसेच यासाठीचा सविस्तर प्रस्ताव छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातर्फे महापालिकेकडे वर्षभरापूर्वी सादर करण्यात आला. या प्रस्तावाला ठाणे महापालिकेतर्फे महासभेत मंजुरीही देण्यात आली. मात्र मंजुरीला वर्ष उलटूनही अद्याप या वाहनासाठी पालिकेतर्फे निविदाच काढण्यात आलेली नाही.

दूध संकलन वाहन असे असेल

हे वाहन ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात फिरणार असून दूधदान करू इच्छिणाऱ्या मातांकडून दूध संकलन केले जाणार आहे. गरजू बालकांना हे दूध पुरविण्यात येणार आहे. दूधदानासाठी लागणाऱ्या यंत्रणेचा समावेश या वाहनामध्ये असणार आहे. या वाहनासाठी ३० लाख ८१ हजार १३६ रुपये खर्च अपेक्षित आहे.