८२ दगडखाणींतून अतिरिक्त उपसा झाल्याचे उघड
ठाणे जिल्हय़ातील रेतीमाफियांपाठोपाठ आता जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी बेकायदेशीररीत्या खनिजाचा उपसा करणाऱ्या दगडखाणीविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईदरम्यान तब्बल ८२ दगडखाणींतून अतिरिक्त उपसा झाल्याची माहिती पुढे आली असून संबंधितांकडून स्वामित्व धनापोटी सुमारे १४ कोटी रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यापैकी साडेसहा कोटी रुपयांची वसूल करण्यात आली आहे. याशिवाय, नवी मुंबईतील पाच खाणी सील ठोकण्याची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे दगडखाणीतून अतिरिक्त खनिजाचा उपसा करणाऱ्या कंपनी मालकांचे धाबे दणाणले आहेत.
ठाणे जिल्हय़ात वेगवेगळ्या भागांत एकूण १४३ दगडखाणी असून या खाणींमधून होत असलेल्या खनिज उपसाच्या प्रमाणाचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. कोल्हापूरच्या उपसंचालक भूविज्ञान आणि खनिकर्ममार्फत टोटल स्टेशन मशीनद्वारे हे सर्वेक्षण करण्यात आले. या मशीनमुळे खाणींमधून नक्की किती उपसा होतो, याची अचूक माहिती कळते. त्यामुळे सर्वेक्षणामध्ये ८२ खाणींनी प्रमाणाबाहेर उपसा केल्याची बाब उघड झाली आहे. या खाणींच्या मालकांकडून स्वामित्व धनापोटी सुमारे १४ कोटी वसुली करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
दरम्यान, या संदर्भात संबंधित खाणमालकांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जोशी यांनी रेतीगट शाखेला दिले होते. त्यानुसार या शाखेच्या पथकाने संबंधित खाणमालकांकडून तातडीने दंडाची वसुली सुरू केली आहे.
आतापर्यंत साडेसहा कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तसेच खनीपट्टा आदेशातील अटी व शर्तीचा भंग केला म्हणून नवी मुंबई येथील तुर्भे परिसरातील पाच खाणींना गेल्या आठवडय़ात सील ठोकण्यात आले आहे, तर जिल्हा प्रशासनाकडून आणखीही पाच ते सहा खाणींना सील ठोकण्याची तयारी सुरू आहे. उर्वरित ६१ खाणींचे सर्वेक्षणदेखील सुरू असून त्यानंतर त्यांच्यावर दंडाची कारवाई करण्यात येणार आहे.