ठाण्यातील रस्ता रुंदीकरण: अतिक्रमणे हटवण्यासाठी नागरिकांना रविवापर्यंतची मुदत
अतिक्रमणे आणि दुकानदारांनी केलेल्या वाढीव बांधकामांवर सलग दोन दिवस चाललेल्या कारवाईमुळे ठाणे रेल्वे स्थानक परिसर मोकळा झाला असताना ठाणे महापालिकेने आता आपला मोर्चा खोपट परिसराकडे वळविला आहे. रस्ता रुंदीकरणाचा पाचवा टप्पा ठाणे महापालिकेने आखला असून त्यानुसार खोपट परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या परिसरातील नागरिकांनी रविवापर्यंत आपली बांधकामे स्वत:हून काढावीत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
ठाणे महापालिकेच्या विकास आराखडय़ाप्रमाणे रस्त्यांची रुंदी असावी, असा पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचा आग्रह आहे. या विकास आराखडय़ाची तंतोतंत अंमलबजावणी प्रशासनाने सुरू केली असून या मोहिमेचा भाग म्हणून शहरातील विविध परिसरांत रस्ता रुंदीकरणास अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवर कारवाई केली जात आहे. पोखरण रस्त्यांच्या रुंदीकरणास अडथळा ठरत असलेल्या बांधकामांवर कारवाई केल्यानंतर या रस्त्यांच्या बांधणीच्या नव्या कंत्राटासही मंजुरी देण्यात आली आहे. याच धर्तीवर पोखरण रस्ता क्रमांक २ चे कामही लवकरच हाती घेतले जाणार आहे. ठाणे रेल्वे स्थानक, बुधाजीनगर, कळवा चौक अशा शहरांतील विविध भागांमधील रस्ता रुंदीकरणाचे आराखडे तयार केले जात असताना ठाणे महापालिकेने आता आपला मोर्चा खोपट परिसराकडे वळविला आहे.
महापालिका आयुक्त जयस्वाल यांनी बुधवारी दुपारी कॅडबरी जंक्शन ते खोपट परिसराचा दौरा केला. सलग तीन तास सुरू असलेल्या या पाहणी दौऱ्यानंतर या मार्गाच्या रुंदीकरणाचा निर्णय जयस्वाल यांनी घेतला आहे. या ठिकाणी राहणारे काही रहिवासी तसेच व्यावसायिकांशी त्यांनी या वेळी संवाद साधला. या वेळी त्यांच्यासोबत पोलीस उपायुक्त सचिन पाटील, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, शहर विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रमोद िनबाळकर यांच्या वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या मार्गावर ‘लाइन मार्किंग’ करण्यात आले असून येथील ‘ग्रीन मार्किंग’पासून पुढे करण्यात आलेले अनधिकृत वाढीव बांधकाम नागरिकांनी स्वत:हून हटवावे, असे आवाहन जयस्वाल यांनी या वेळी केले. येत्या रविवापर्यंत अतिक्रमित जागा मोकळी करा, अन्यथा कारवाईशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका जयस्वाल यांनी या वेळी मांडली.