उद्यान, शैक्षणिक कामांसाठी आरक्षण; कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकसत्ता प्रतिनिधी

डोंबिवली :  ठाकुर्लीजवळील ९० फुटी रस्त्यावरील खंबाळपाडा भागात कल्याण-डोंबिवली पालिकेच्या उद्यान आणि शैक्षणिक कामांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडांवर सात ते आठ माळ्यांच्या बेकायदा इमारती उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर पालिकेला शाळा, बगिचे, उद्यान या कामांसाठी भूखंडांची येत्या काळात आवश्यकता आहे. मात्र हे भूखंडच माफियांकडून गिळंकृत केले जात असून महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

खंबाळापाडा भागात उद्यान, शैक्षणिक कामासाठी भूखंड आरक्षित आहेत. जमीनमालकाला पालिकेने या भूखंडांचा टीडीआर स्वरूपात मोबदला देऊन भूखंडांचे सातबारा उतारे पालिकेच्या नावाने करून घेतले आहेत. टीडीआर देताना पालिकेने जमीनमालक आणि त्याचा भागीदार विकासकाला टीडीआरचा वापर करण्यापूर्वी पालिकेला उद्यान, शैक्षणिक भूखंड विकसित करून देण्याच्या अटी घातल्या आहेत. विकासकाने टीडीआरचा वापर करून पालिकेच्या परवानगीने इतरत्र इमारती बांधल्या. या इमारतींना दोन वर्षांपूर्वी पालिकेच्या तत्कालीन नगररचनाकारांनी बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिले आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

जोपर्यंत विकासक उद्यान, शैक्षणिक भूखंडाचा विकास करून देत नाही, तोपर्यंत त्यांच्या अधिकृत इमारतींचे बांधकाम पूर्णत्व दाखले नगररचना अधिकाऱ्यांनी रोखून धरणे आवश्यक होते. मात्र, तरीही ते देण्यात आले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

खंबाळपाडामधील भोईरवाडीत उद्यानाच्या आरक्षणावर सात माळ्यांची बेकायदा इमारत भूमाफिया बांधत आहेत. या इमारतीमधील सदनिका विक्रीची कामे ऑनलाइन, समाजमाध्यमातून सुरू करण्यात आली आहेत. या इमारतींचे बांधकाम आराखडे पालिकेने मंजूर केले आहेत, अशी खोटी माहिती माफियांकडून ग्राहकांना देण्यात येत आहे.

पालिकेकडून बेकायदा बांधकामांविरोधात कारवाई सुरू असल्याने या कारवाईतून आपल्या इमारतींची सुटका व्हावी म्हणून या दोन्ही भूखंडांवरील बेकायदा इमारतींची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.

पालिका म्हणते, पाहणी करू!

‘खंबाळपाडय़ातील हे दोन्ही भूखंड आरक्षित असल्याने त्यांच्यावर बांधकाम करता येत नाही. जमीनमालकाने या दोन्ही भूखंडांचा टीडीआर घेतला आहे. त्याने टीडीआरवर इमारत उभारण्यापूर्वी उद्यानाचा विकास करून देणे आवश्यक आहे. तसे न करता विकासक इतरत्र इमारत बांधून मोकळा झाला आहे. तसेच उद्यान, शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर माफिया इमारती बांधून ती हडप करीत आहेत. अतिक्रमण नियंत्रण विभागाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे,’ असे नगररचना विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. ‘खंबाळपाडय़ात उद्यान, शाळेच्या भूखंडावर सुरू असलेल्या बेकायदा टोलेजंग बांधकामांची माहिती मिळाली आहे. या कामांची पाहणी करून संबंधितांना नोटिसा देऊन या इमारती जमीनदोस्त केल्या जातील,’ अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.