प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे नगरसेवकांचा आरोप

बदलापूर शहरामधील नाल्यांवर मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण केले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केला. नगरपालिकेचे शहर अभियंता आणि मुख्याधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे काही प्रतिथयश बांधकाम व्यावसायिक या नाल्यांवर बांधकामे करत असून काहींनी बांधकाम साहित्य टाकण्यासाठी नाल्यांचे रूपांतर कचरा भूमीत केल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला.

बदलापूर नगरपालिकेतील नालेसफाईची विशेष सभा ३० रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र, विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांचे राजकीय पर्यटन असल्याने ही सभा तहकूब करून बुधवारी घेण्यात आली. या सभेत नगरसेवकांनी शहरातील नैसर्गिक नाल्यांचे प्रवाह काही बांधकाम व्यावसायिक अडवत असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली. अनेक भागांमधील नाल्यांवर बांधकाम व्यावसायिकांनी मातीचा भराव टाकला आहे, असा आरोप भाजपच्या गटनेत्यांकडून करण्यात आला. बदलापूर पश्चिमेतील भारत कॉलेज, बॅरेज रोड अशा सखोल भागात अतिरिक्त भराव टाकल्याने पाणी साठण्याची भीती आहे. कमी पावसातही येथे पाणी तुंबते. त्यामुळे अशा नैसर्गिक नाल्यांचे प्रवाह बंद करणाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई केली जावी, अशी मागणी राजेंद्र घोरपडे यांनी सभागृहात केली. शहरातील अनेक नाल्यांचे अद्याप स्थाननिश्चित करण्यात आलेले नाही. त्याकडे नगरपालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी नाल्यासंबंधी नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले. शहर अभियंता आणि मुख्याधिकारी यांनी नैसर्गिक नाल्यांतील अनधिकृत बांधकामांवर लक्ष न ठेवल्याने  त्यांनीही प्रशासनाला धारेवर धरले.

नाले सर्वेक्षणाची फाइल गहाळ?

शहरातील नाले, त्यांची रुंदी आणि एकूण क्षेत्रफळ याबाबत झालेल्या सर्वेक्षणाची फाइल गहाळ झाल्याचा गौप्यस्फोट नगररचनाकार सुदर्शन तोडणकर यांनी केला. त्यांच्या या खुलाशावर  नगरसेवकांनी  टीकास्त्र सोडले. फाइल नेमकी कुठे गहाळ झाली, असा सवाल नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी करताच मुख्याधिकारी यांच्याकडे ती सुपूर्द केल्याचा  दावा तोडणकरांनी केला.