फौजदारी कारवाईच्या पालिका आयुक्तांच्या आदेशानंतरही पोलीस ठाण्यात ‘तडजोड’

डोंबिवलीतील आजदेपाडा गावात जाणाऱ्या रस्त्यात मंडप उभारून सांस्कृतिक कार्यक्रम करणाऱ्या भाजप नगरसेवक विनोद काळण यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे सुट्टी असूनही ‘ग’ व ‘फ’ प्रभागातील अधिकारी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या कामाला लागले होते. मानपाडा पोलीस ठाण्यात नगरसेवक काळण यांना पोलिसांनी पाचरण केल्यानंतर त्यांनी पालिका व वाहतूक विभागाने परवानग्या दिल्याचे स्पष्ट केले. मग पोलीस, पालिका अधिकारी घटनास्थळी गेले. तिथे मंडप व्यासपीठ रस्त्यामध्येच उभारण्यात आल्याचे दिसले. व्यासपीठाचा एक टेबल रस्त्यावरची वाहतूक बंद करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतरही नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

वाहतूक विभागाने नगरसेवकाने परवानगी घेतलीच नसल्याचे म्हटले होते. प्रत्यक्ष घटनास्थळी रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण बंद केल्याचे प्रत्यक्षदर्शी आणि शनिवारी पालिका, पोलीस अधिकारी घटनास्थळी गेले, तेव्हा दिसून आले होते. मग आयुक्त वेलरासू यांनी आदेश देऊनही नगरसेवकाविरुद्ध गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

शुक्रवारी संध्याकाळपासून आजदे गावात जाणारा रस्ता सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नगरसेवक काळण यांनी मंडपाचे व्यासपीठ उभारून बंद केला होता. त्यामुळे एमआयडीसीत जाणाऱ्या नागरिकांना वळसा घालून घर गाठावे लागत होते.

रिक्षा, खासगी वाहनचालकांना रस्ता बंद करण्यात आल्याने मनस्ताप सहन करावा लागत होता. याप्रकरणी एमआयडीसीतील अनेक नोकरदार मंडळींनी माध्यमांशी संपर्क करून मंडपामुळे रस्ता बंदच्या तक्रारी केल्या होत्या. मंडपासमोर भर रस्त्यात खुच्र्या, मोठय़ा आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यात आले होते.

याविषयीचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये शनिवारी प्रसिद्ध होताच, आयुक्त पी. वेलरासू यांनी संबंधित नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. बेकायदा मंडप उभारणीप्रकरणी न्यायालयाने अवमान कारवाईचा बडगा आयुक्तांवर उगारला आहे. त्यामुळे आयुक्तांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले होते.  आजदे विभाग पालिकेच्या ‘ई’ प्रभागाच्या अंतर्गत येतो. या प्रभागाचे प्रभाग अधिकारी प्रभाकर पवार रजेवर असल्याने त्यांचा भ्रमणध्वनी शनिवारी बंद होता.

उपअभियंता किरण वाघमारे व अन्य कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी बंद असल्याने नगरसेवकाला व्यासपीठ उभारणीस परवानगी दिली की नाही हे अधिकाऱ्यांना समजत नव्हते. आयुक्तांनी कोणीही जबाबदार अधिकाऱ्याने भ्रमणध्वनी बंद करून ठेवू नये, असे आदेश दिले असताना ई प्रभागातील अधिकारी मात्र भ्रमणध्वनी बंद करून घरी बसले होते. आयुक्तांच्या आदेशाचे पालन करणे आवश्यक असल्याने अखेर ‘ग’ प्रभागाचे प्रभाग अधिकारी परशुराम कुमावत, शरद पाटील, संजय कुमावत यांना गुन्हा दाखल करण्यासाठी मानपाडा पोलीस ठाण्यात जाण्याचे वरिष्ठांकडून फर्माविण्यात आले. पोलिसांनी नगरसेवक काळण, वाहतूक विभागाच्या परवानग्या दाखविल्या. मग पथक तिथे गेल्यावर मंडप रस्त्यावरच उभारण्यात आल्याचे आढळून आले.

पुढील कारवाईविषयी आदेशाची प्रतीक्षा

नगरसेवक विनोद काळण यांनी आजदे गावातील कार्यक्रमासाठी मंडप व्यासपीठ उभारणीसाठी परवानगी घेतली होती. पालिकेने दाखवून दिलेल्या मोजमापापेक्षा वाढीव क्षेत्रात मंडप उभारणी केली होती. वाढीव मंडप काढून टाकण्यात आल्यामुळे अद्याप तरी त्यांच्यावर कोणती कारवाई झाली नाही; पण पुढील कार्यवाहीबाबत आपणास माहिती नसल्याचे ‘ई’ प्रभागातील एका सूत्राने सांगितले; आयुक्त मात्र या प्रकारामुळे संतप्त झाले असल्याचे समजते.