वाहनचालकांची गैरसोय; वाहनतळाला तात्काळ पर्याय नाहीच

लोकसत्ता प्रतिनिधी

अंबरनाथ: अंबरनाथ पश्चिमेतील स्थानकाशेजारच्या वाहनतळावर वाहने उभी करण्याच्या नावाखाली बेकायदा वसुली करण्यात येत होती. ‘लोकसत्ता ठाणे’ने ही बाब उघडकीस आणल्यानंतर अखेर नगरपालिका प्रशासनाने ही बेकायदा वसुली बंद पाडली आहे. मात्र वसुलीसोबत येथील वाहनतळही बंद करण्यात आल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. वाहनचालकांना मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी करावी लागत आहेत. त्यामुळे वाहने उभी करण्याचा नवा पर्याय देण्याची मागणी होत आहे.

एकीकडे शहरातील रस्ते, पदपथ फेरीवाले, बेकायदा वाहने उभी केल्याने कोंडीत अडकलेली असतानाच दुसरीकडे पालिका प्रशासनाकडूनच वाहनतळाचे पर्याय उपलब्ध करून दिले जात नसल्याने वाहनचालकांची कोंडी होत आहे. अंबरनाथ पूर्वेत फक्त दोन ठिकाणी वाहनतळांचा पर्याय वाहनचालकांसाठी उपलब्ध आहे. पश्चिम भागातही स्थानकाला लागूनच रिक्षा थांब्यासाठी आरक्षित केलेला आणि राज्य परिवहन मंडळाचा असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यातील पश्चिमेतील परिवहनच्या जागेवर वाहने उभी केली जातात, तर स्थानकालगतच्या जागेवर स्थानक परिसरात कोंडी करणाऱ्या रिक्षा थांब्यावरील रिक्षा उभ्या केल्या जाणार आहेत. तसा निर्णय २०१९ मध्ये घेण्यात आला होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी बेकायदा पद्धतीने वाहनचालकांना बनावट पावती देऊन वसुली केली जात होती. पालिका प्रशासनाने कोणत्याही कंत्राटदाराला न नेमता ही वसुली होत असल्याबाबतचे वृत्त २ मार्च रोजी ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर लगेचच अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी ३ मार्च रोजी येथील बेकायदा वसुली बंद पाडली. मात्र हे करत असतानाच येथील वाहनतळही बंद करण्यात आल्याने सध्या तरी वाहनचालकांची गौरसोय होत आहे. वाहनतळ बंद झाल्याने वाहनचालक स्थानकाच्या आसपासच्या परिसरात मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी करत आहेत. त्यामुळे स्थानक परिसरात पुन्हा कोंडी वाढल्याचे चित्र आहे.

येथील बेकायदा पद्धतीने होणारी वसुली बंद करण्यात आली आहे. तसेच लवकरच बेकायदा वसुली करणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. या ठिकाणी अल्प कालावधीसाठी वाहनतळ कंत्राटदार नेमला जाईल. नागरिकांची गैरसोय होऊ  नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

– डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपालिका