आनंदनगर, भास्कर कॉलनी परिसरातील रस्त्यांवरील कामांमुळे अडथळे;  सेवा रस्त्यांवर वाहनांचे अवैध पार्किंग

ठाणे : कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचे काम करताना या मार्गावरील वाहतूक पर्यायी रस्त्यांवरून वळवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, या पर्यायी रस्त्यांवर सुरू असलेली कामे आणि अवैध पार्किंग यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. आनंदनगर रस्ता आणि भास्कर कॉलनी या परिसरात सुरू असणारी रस्त्यांची कामे तसेच कोपरी गाव आणि येथील सेवा रस्ता परिसरातील मार्गाच्या दुतर्फा उभी असणारी अवैध वाहने यामुळे वाहतुकीत अडथळे येत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामामुळे या पुलावरून होणाऱ्या वाहतुकीला पर्यायी रस्ते वळवण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला. त्यानुसार कोपरी रेल्वे पुलावरून महामार्गालगतच्या सेवा रस्त्याने तसेच आनंदनगर मार्गे ही पर्यायी वाहतूक सुरू झाली. कोपरी पुलाच्या वाहतूक कोंडीत अडकू नये, यासाठी अनेक वाहने या पर्यायी मार्गाचा वापर करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे पर्यायी रस्तेही कोंडीग्रस्त होऊ लागले आहेत.

मुंबईहून आनंदनगर टोलनाकामार्गे ठाण्याच्या दिशेने जायचे झाल्यास आनंदनगर रस्त्याचा पर्याय आहे. या ठिकाणी जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे या मार्गाऐवजी वाहनचालक कोपरी सेवा रस्ता आणि कोपरी गाव या मार्गाचा अवलंब करतात. येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने अवैधपणे उभी केली जातात. या रस्त्यावर अनेक ठिकाणी भंगार वाहनेही उभी करण्यात आली आहेत. त्यामुळे हा सेवा रस्ता अरुंद बनला आहे. परिणामी गर्दीच्या वेळी या रस्त्यावर वाहतुकीचा भार वाढून वाहनांच्या रांगा लागतात. या कोंडीतून सुटका होत नाही तोच शहराच्या मध्यवर्ती भागात जाण्यासाठी पर्याय असलेल्या भास्कर कॉलनी मल्हार चौकाच्या दिशेने जाणारा एक मार्ग रस्ता दुरुस्तीच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.  त्यामुळे वाहनचालकांना उड्डाणपुलाचा मार्ग स्वीकारावा लागतो. त्यामुळे अंतर्गत उड्डाणपुलावरही मोठी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. अंतर्गत मार्गावर होणाऱ्या कोंडीत सापडण्याऐवजी काही वाहनचालक पुन्हा महामार्गाचा पर्याय स्वीकारू लागले असून यामुळे येथेही पूर्वीपेक्षा वाहनांची संख्या वाढली आहे.

या प्रकरणी ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

टोलनाक्यावरही वाहतूक कोंडी

पर्यायी मार्गासह कोपरी पुलावरही वाहतूक कोंडी होत असल्यामुळे सकाळी आणि सायंकाळी वाहनांच्या दूरवर रांगा लागतात. या रांगा आनंदनगर टोलनाक्यापर्यंत जातात. परिणामी टोलनाक्यावरही वाहतूक कोंडी होते. या कोंडीत प्रवाशांना अर्ध्या तासाहून अधिक काळ अडकून राहावे लागत आहे.