विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त

ठाणे : जिल्ह्य़ातील शहरी तसेच ग्रामीण भागात मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी ३१ हजार २८३ गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुका काढण्यास बंदी असल्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने गणरायाला निरोप देण्याची तयारी नागरिकांसह सार्वजनिक मंडळांनी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्य़ातील कृत्रिम तलाव, विसर्जन घाटांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

करोना विषाणू प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा तसेच महापालिका प्रशासनाने विसर्जन मिरवणुकांना बंदी घातली आहे. त्यामुळे दीड, पाच, सात दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दहा दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन होणार आहे.

ठाणे ते बदलापूपर्यंतच्या शहरात मंगळवारी सार्वजनिक ३६४ तर घरगुती ३० हजार ९१९ गणेशमूर्तीचे विसर्जन होणार आहे. त्यामध्ये ठाणे, कळवा, मुंब्रा शहरातील सार्वजनिक ८४ तर घरगुती ११ हजार ६३२, भिवंडीतील सार्वजनिक ८२ तर घरगुती २ हजार ७२०, कल्याण – डोंबिवलीतील सार्वजनिक ९७ तर घरगुती ९ हजार ६०२ आणि उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमध्ये सार्वजनिक १०१ तर घरगुती ६ हजार ९६५ गणेशमूर्तीचा समावेश आहे. विसर्जन काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कृत्रिम तलाव, विसर्जन घाटावर पाच हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय, एक शीघ्र कृती दलाची कंपनी, राज्य राखीव दलाच्या चार कंपन्या आणि चार बॉम्बशोधक पथकही तैनात असणार आहे.