|| सुहास बिऱ्हाडे

पालिकेकडून पाणी लाभ कराची अंमलबजावणी नाही

वसई : वसई-विरार महापालिकेने पाणीपुरवठा सेवेतून १७८ कोटी ८८ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे. तरीही पाणीपट्टीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. शहरातील सर्व मालमत्ताधारकांकडून पाणी लाभ कर आकारण्याची तरतूद असताना तो आकारला जात नसल्याने कोटय़वधी रुपयांचे नुकसान होत आहे.

मालमत्ता करापाठोपाठ पालिकेचे सर्वाधिक उत्पन्न हे पाणी करातून मिळत असते. पालिकेने २०२०-२१ या वर्षांसाठी पाणीपुरवठय़ावर २७१ कोटी ८५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. पाण्याच्या ४६ हजार नळजोडण्या पालिकेने दिलेल्या आहेत. पाणीपुरवठय़ावर कोटय़वधी रुपयांचा खर्च करताना पालिकेने पुढील आर्थिक वर्षांत १७८ कोटी ८८ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरलेले आहे. पाणीपट्टी करातून हे उत्पन्न वसूल केले जाणार आहे. मात्र, अद्याप पालिकेने पाणी लाभ कर आकारलेलाच नाही. पालिकेच्या मालमत्ता कराच्या अधिनियम १२८ (अ) अन्वये पाणी लाभ कर आकारण्याची तरतूद आहे.

शहरातील सर्व मालमत्ताधारकांना पाणी लाभ कर आकारण्याची तरतूद आहे. नळजोडणी असेल वा नसेल, संबंधित मालमत्ताधारक पाण्याचा वापर करत असेल वा नसेल तरी त्यांच्याकडून पाणी लाभ कर आकारण्याची तरतूद आहे. पाणी योजना राबविण्यासाठी जी पायाभूत उभारणी करावी लागते, यासाठी हा कर असतो.

शहरात विहिरी आणि कूपनलिका आहेत. यातील बहुतांश विहिरींचा वापर व्यावसायिक वापरासाठी होत असतो. याशिवाय गॅरेज, हॉटेल  व इतर व्यावसायिक आस्थापना नैसर्गिक संपत्ती असलेल्या पाण्याचा वापर करीत असतात. अनेक विहीरमालक विहिरीचे पाणी टँकरचालकांना विकून पैसा कमवत असतात. ते नैसर्गिक पाण्याचा लाभ घेत असताना त्यांच्याकडून मात्र कसलाही कर आकारला जात नाही. कुणाच्या मालकीची विहीरवा कूपनलिका असेल तरी त्यातील पाण्याचा वापर व्यावसायिक वापरासाठी झाला तर त्या व्यक्तीकडून पाणी लाभ कर आकारण्याची तरतूद स्पष्ट असल्याचे पर्यावरण कार्यकर्ते चरण भट यांनी सांगितले.

पाणी लाभ कराची तरतूद आहे. मात्र हा कर लावला तर जनतेवर आर्थिक बोजा पडेल. यासाठी जनतेच्या हितासाठीच आजवर पाणी लाभ कर लावण्यात आलेला नाही. पालिका नागरिकांकडून केवळ पाणीपट्टी कर आकारते. -विश्वनाथ तळेकर, प्रभारी साहाय्यक आयुक्त, पालिका