समता विचार प्रसारक संस्थेच्या वतीने १ मे रोजी ठाण्यात सुरू करण्यात आलेल्या अक्षय ऊर्जा अभियानाने शंभर दिवसात दीडशेहून अधिक इमारतींचे उर्जा परीक्षण (ऑडिट) यशस्वी करीत अभियानाची घौडदौड कायम ठेवली आहे. महाराष्ट्र दिनी सुरू झालेल्या या अभियानाची सुरूवात ठाण्यातील रहेजा कॉम्पलेक्समधील ‘आमल्फी अस्कोना’ सोसायटी पासून झाली. त्यानंतर सिद्धांचल, विकास कॉम्प्लेक्स, समता नगर, साकेत, थाईम (एवरेस्ट वर्ल्ड), नोरिटा -आंजेलिका (प्राइड पार्क), जास्पर (हिरानंदांनी इस्टेट), पलश उपवन, जीवन धर्म, हार्मनी (प्रेस्टीज पार्क) सरोवर दर्शन, यांसारख्या विविध इमारती या अभियानामध्ये सहभागी होत गेल्या.
समता विचार प्रसारक संस्थेने महाराष्ट्र दिनी सुरू केलेल्या अक्षय ऊर्जा अभियानातर्फे ठाण्यात सुरू असलेल्या गृह निर्माण संस्थांच्या विनामूल्य ऊर्जा परीक्षणाने (ऑडिट) चांगलीच मजल मारली असून अभियानाच्या पहिल्या शंभर दिवसात दीडशेहून अधिक इमारतींच्या ऊर्जा परिक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती ऊर्जा तज्ञ आणि मुंबईतील व्हाी.जे.टी.आय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी दिली. केंद्रीय अक्षय ऊर्जा दिनानिमित्त प्रकाशित केलेल्या अहवालात त्यांनी हे नमुद केले. दीडशे इमारतींपैकी १३१ इमारतींचे ऊर्जा परीक्षण पूर्ण झाले असून १९ इमारतींचे ऊर्जा परीक्षण चालू असून ७९ इमारतींची कागदपत्रे संस्थेकडे आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उर्जेचा संतुलित, विवेकी वापर करणे आवश्यक आहे. सौर आणि पवन उर्जेसारखी अक्षय ऊर्जा पुढील भविष्यातील ऊर्जा संकटाला समर्थपणे तोंड देण्यासाठी प्रभावी उपाय असल्याचे डॉ. संजय यांनी सांगितले. ऊर्जा अहवालात शून्य गुंतवणूक, थोडी गुंतवणूक आणि मोठी गुंतवणूक असलेल्या शिफारशी देण्यात आल्या आहेत. या सर्व शिफारसी गृहनिर्माण संस्थांनी गंभीरपणे मनावर घेतल्या असून त्यांनी त्या दृष्टीने पाऊले टाकायला सुरुवात केली आहे. अक्षय ऊर्जा अभियानाने नागरिकांमध्ये ऊर्जा बचतीसंबंधी, ऊर्जेच्या कार्यक्षम वापरासंबंधी आणि अक्षय ऊर्जेचा प्रसार होण्यासाठी खूप मदत केली आहे. अक्षय ऊर्जा अभियानाला समर्थ असे प्रायोजक मिळाले तर अक्षय ऊर्जेच्या प्रसार आणि प्रचारासाठी मदत होऊन अभियानाचे काम फोफावू शकेल, असा विश्वस डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी व्यक्त केला.