किन्नरी जाधव, दिशा खातू

‘इमिटेशन’ अलंकारांच्या दरांत घसघशीत वाढ; सर्वसामान्य ग्राहकांना ऑनलाइन सवलतींचा आधार

ठाणे : दिवसगणिक महाग होत असलेल्या सोन्याच्या दागिन्यांची खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झाली असतानाच सणासुदीला सालंकृत साजासाठी पर्याय समजले जाणारे ‘इमिटेशन’ (नकली) अलंकारही आता परवडेनासे झाले आहेत. इमिटेशन दागिन्यांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालासह तयार दागिन्यांवर आकारण्यात येणाऱ्या दुहेरी वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) हे दागिने चांगलेच महाग झाले आहेत. साध्या दर्जाची बुगडी, कानातले असे दागिने २०० रुपयांना मिळत असले तरी खडय़ांनी कलाकुसर केलेले कर्णाभूषण, ब्रेसलेट यांचे दर अडीच हजार रुपयांपासून सुरू होत आहेत. त्यामुळे यंदाच्या दिवाळीसाठी नकली दागिने खरेदी करण्यासाठीदेखील ग्राहकांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

सोन्याचे दागिने घालण्यापेक्षा इमिटेशन दागिन्यांमधील किंवा सोन्याचा मुलामा असलेले दागिने परिधान करण्याकडे महिलांचा कल असतो. बुगडी, मोतीहार, नथ अशा आकर्षक दागिन्यांनी महिलांना भुरळ घातली असतानाच दिवाळी सणात दागिन्यांसाठी नेहमीपेक्षा जास्त खर्च करावे लागणार आहेत. सध्या बाजारात बुगडी, नथ हे दागिने २०० रुपयांपासून अडीच हजारापर्यंत विकले जात आहेत. या दागिन्यांमध्ये हाताने तयार केलेल्या दागिन्यांना महिलांची जास्त मागणी असून इतर दागिनांच्या तुलनेत हे जास्त किमतीत विकण्यात येत आहेत. इमिटेशन दागिन्यांमधील चांगल्या दर्जाचे खडय़ाचे कानातले अडीच हजार रुपयांपासून बाजारात उपलब्ध आहेत. तसेच हातातील ब्रेसलेटही तीन हजार रुपयांना विकण्यात येत आहे, असे ठाण्यातील काही विक्रेत्यांनी सांगितले.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मंगळसूत्राला जास्त मागणी असून जयपुरी बिट्स आणि टेम्पल मंगळसूत्र महिलांना आकर्षित करीत आहे. मात्र हे दोन्ही प्रकारचे मंगळसूत्र हातानी तयार करण्यात येत असल्याने २२०० रुपयांपासून विकण्यात येत असल्याचे ठाण्यातील विक्रेत्या अर्चना भोर यांनी सांगितले. मुख्य बाजारपेठेत दागिन्यांचे भाव वाढलेले असतानाच दिवाळीनिमित्त ऑनलाइन संकेतस्थळांवर मात्र २० ते ८० टक्के सवलत इमिटेशन दागिन्यांवर लावण्यात आलेली आहे. ऑनलाइनमध्ये कापडाचे दागिने मोठय़ा प्रमाणात विकले जात आहेत, असे डिझाइनर मानसी कपूर यांनी सांगितले.

जीएसटीचा फटका

घाऊक बाजारात दागिने अगदी स्वस्तात मिळत आहेत. मात्र किरकोळ बाजारात दागिन्यांच्या किमती खूप महागल्या आहेत. साध्या दुकानांपेक्षा नवीन ट्रेण्ड किंवा डिझायनर दुकानांमध्ये दागिन्यांचे भाव ४० टक्क्यांनी वाढलेला दिसत आहे. दागिन्यांवर ५ टक्के जीएसटी असल्याने किमती वाढल्या आहेत. तसेच दागिन्यांच्या प्रक्रियेवर १० टक्के जीएसटी लागतो. त्यामुळे या किमती वाढल्या असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

‘पद्मावती’चा ट्रेण्ड

पद्मावती दागिन्यांनी ग्राहकांचे लक्ष आकर्षून घेतले आहे. या सिनेमातील राजस्थानी, रजवाडी दागिन्यांच्या कलाकुसरी दिसून येतात. सोनसाखळीत हत्ती, मोर किंवा काही खास नावे लिहिलेली आढळतात. पैंजण, कडे, हार आणि कानातले दोन हजारापर्यंत उपलब्ध होत आहेत. कुर्त्यांवर परिधान करता येणारे भौमितिक रचना असलेले दागिने ३०० रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत विकले जात आहेत.

इमिटेशन दागिन्यांसाठीचा कच्चा माल स्वस्त झाल्याने दागिन्यांचे दर काही महिन्यांपूर्वी कमी झाले होते. मात्र, जीएसटीमुळे हे दागिने महाग होत आहेत. गुजरात, राजस्थान येथून येणाऱ्या दागिन्यांच्या किमतीतही जवळपास ३० टक्क्यांची वाढ झाली आहे.

– अलोक त्रिवेदी, विपणनतज्ज्ञ