thlogo03पक्षी लहान मुलांना, तरुणांना आणि वृद्धांनाही आवडतात. पक्ष्यांबद्दल एक विलक्षण ओढ प्रत्येकाच्या मनात असते. त्यांचे पंख पसरणं, हवेत भरारी घेणं, पंख न हलवता हवेत नुसतं तरंगत राहणं, झप्कन खाली जमिनीवर अथवा पाण्यात झेप घेऊन भक्ष्य पकडणं, पंखांत चोच खुपसून ती साफ करणं, स्वत:च्याच पाठीवर लांब मान टाकून झोपून राहणं, कधी नागमोडी तर कधी वरखाली-वरखाली उडत सुसाट वेगाने अंतर कापत जाणं, हे पाहून माणूस स्तंभित होतो. आपल्याला पक्ष्यांसारखी रंगबिरंगी पिसंही नाहीत आणि उडताही येत नाही याच वैषम्य माणसाला वाटत असावं.
या पृथ्वीवर पक्ष्यांचा जन्म; पृथ्वीच्या जन्माच्या तुलनेत तसा आताआताचा. म्हणजे १५० लाख वर्षांपूर्वीचा. सरपटणारे प्राणी मात्र त्याच्याही आधी पृथ्वीवर होतेच. त्यांना बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेताना, निसर्गाशी टक्कर द्यावी लागली. स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी प्रचंड धडपड करावी लागली आणि त्याच्यापेक्षा जास्त धडपड पिलांना जन्म देऊन त्यांनाही जगण्यासाठी लायक बनवण्यासाठी करावी लागली. बदलत्या परिस्थितीवर मात करून पुढे जात असताना त्यांच्यात अनेक बदल घडत गेले. मध्येच कधी तरी त्यांच्या खाद्याचे अन्नाचे स्वरूपही बदलले असावे. खाद्य मिळवण्यासाठी कधी कधी ते उडय़ा मारू लागले. नंतर या उडय़ांचे प्रमाण वाढत गेले. त्यामुळे त्यांच्यापैकी काहींच्या पुढच्या पायांची लांबी कमी होत गेली. पण मागच्या पायांची तेवढीच राहिली. नंतर या उडय़ांचे प्रमाण खूपच वाढले, त्याचबरोबर उडीची उंची आणि लांबी पण वाढत गेली.
या घडामोडीत पोटाची कातडी वारंवार ताणली गेली व त्यातूनच पुढे पोटाच्या कातडीला घडय़ा पडू लागल्या. पूर्वी हेच सरपटणारे प्राणी उडी घेऊन खाली येताना धाडकन जमिनीवर येत होते, पण आता ते थोडेसे तरंगून सावकाश उतरू लागले. हळूहळू पुढच्या पायांचे रूपांतर पंखांत झाले. पुढे पुढे ही उडी फक्त उडीच न राहता तिचं उड्डाण झालं. अर्थात उत्क्रांतीमध्ये कोणताही बदल हा ठरवून झालेला नसतो. ज्यांच्यात असे बदल झाले ते जगले, टिकले आणि त्यांचा वंश पुढे चालू राहिला. जे जीव या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकले नाहीत किंवा परिस्थितीवर मात करू शकले नाहीत, तेसुद्धा आज आपल्याला दिसू शकतात पण जीवाश्मांच्या स्वरूपात.
सर्वच पक्षी उडत असले तरी त्यांच्या पंखातही बदल होत गेले. प्रत्येकाची उडण्याची पद्धत काही सारखीच नव्हती. त्यातही स्पर्धा होतीच. इतर पक्ष्यांच्या तुलनेत ‘आर्क्टिक टर्न’ या पक्ष्याच्या पंखात अचंबित व्हावे असे बदल झाले. अख्खी पृथ्वी पादाक्रांत करायची आणि तीही एका वर्षांत इतकी हिंमत ठेवणारा हा पक्षी म्हणजे आर्क्टिक टर्न समजायला अगम्य आहे. त्याच्या आयुष्यात एकच लक्ष्य त्यांनी स्वत:समोर ठेवलेले आहे असे वाटते. उत्तर ध्रुवावरून थंडी सुरू झाली की निघायचे ते थेट दक्षिण ध्रुवाकडे. उन्हाळ्याच्या सुट्टीला जावे तसे दक्षिण ध्रुवाला पोचले, एखाद्-दुसरा महिना विश्रांती घेतली, थोडी ताकद साठवली की निघाले पुन्हा उत्तर ध्रुवावर. तिकडे उन्हाळ्याच्या सुट्टीला. अर्थात हा सर्व प्रवास ते समुद्राच्या किनाऱ्याने करत असतात. थेट समुद्रावरून नाही.
ऑगस्टमध्ये ककवरून स्थलांतराला सुरुवात करायची आणि नोव्हेंबरमध्ये अंटार्क्टिकावर पोचायचे, पुन्हा फेब्रुवारीत अंटार्क्टिका वरून आर्क्टिक इतके बळ या पक्ष्याच्या पंखात आले कोठून? त्याचे रहस्य त्याच्या पंखाच्या आकारात लपलेय.
आर्क्टिक टर्नचे पंख त्याच्या शरीराच्या मानाने लांब असतातच, शिवाय खांद्यापासून बाहेर आल्यावर आतल्या बाजूला वळून थोडा वक्राकार घेऊन पुन्हा बाहेर येतात. मग एक जबरदस्त कोन घेऊन निमुळते होत होत टोकदार होतात. या पंखांना साथ देणारा टर्नचा सडपातळ बांधा, पाय छोटे, उडताना नेहमीच शेपटीच्या आत लपलेले. त्यामुळे शेपटीचा उपयोग सुकाणूसारखा, दिशा बदलायला, कोलांटी मारायला, पाण्यात झेप घ्यायला उपयोगी. म्हणून तर एका वर्षांत १७ हजार कि.मी. अंतर येताना आणि तितकेच परतीच्या प्रवासात हा पक्षी लीलया पार करतो, असा हा आश्चर्यजनक पक्षी दोन्ही ध्रुवांच्या मध्ये उडत राहतो. त्याऐवजी वर उडत गेला असता तर चंद्रावरही जाऊन आला असता.
मेधा कारखानीस

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
woman works ten time then men
‘बायकांना काय काम असतं?’ हे वाक्य पुन्हा कुणी बोलणार नाही! पुरुषांपेक्षा ‘इतके पट’ अधिक काम करतात महिला
Does Achar Really Go Bad If Women In Periods Touch
मासिक पाळीत लोणच्याला हात लावला तर खरंच खराब होतं का? जया किशोरीचं स्पष्ट उत्तर, पाहा दोन्ही बाजू