स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्याण-डोंबिवलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असतानाच कल्याण-डोंबिवली परिसरांतील तब्बल ५६ चौकांमध्ये सामूहिक राष्ट्रगीत गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी १५ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रगीताचे सूर निनादणार आहेत.‘देशासाठी ५२ सेकंद देणार का,’ असा प्रश्न विचारणारे फलक गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवली शहरात झळकत होते. बुधवारी या प्रश्नाचा उलगडा करणारे फलक शहरात लावण्यात आले. येत्या १५ ऑगस्ट रोजी शहरातील ५६ चौकांमध्ये सामूहिक राष्ट्रगीत गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून राष्ट्रगीत म्हणण्यासाठी लागणाऱ्या ५२ सेकंदांचा वेळ नागरिकांनी द्यावा, असे आवाहन नव्या फलकाद्वारे करण्यात आले आहे. कल्याणचे आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडणार आहे. कल्याण पश्चिमेतील उंबर्डे गावातील नेटकऱ्या चौक, श्री कॉम्प्लेक्समधील कै. विशाल भोईर चौक, अग्रवाल कॉलेज चौक, निक्कीनगर चौक, वायले नगर चौक, वसंत व्हॅली चौक, स्व. रविकांत वायले चौक (पोद्दार स्कूल), खडकपाडा, गोदरेज चौक, गोदरेज हिल चौक, गौरीपाडा तलाव, बिर्ला कॉलेज चौक, शिवाजी चौक, अहिल्याबाई चौक, गांधी चौक, बाजारपेठ चौक, दुधनाका चौक, लालचौकी अशा विविध परिसरांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे मोहोने आणि टिटवाळ्यातील पाटीदार हॉल चौक , वडवली गणपती मंदिर चौक, अटाळी मारुती मंदिर चौक, एन.आर.सी. गेट चौक, गणपती मंदिर टिटवाळा येथे सामूहिक राष्ट्रगीत म्हणण्याचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.