महाराष्ट्र.. गडकिल्ल्यांचा महाराष्ट्र. या गडकिल्ल्यांवर इतिहासाच्या पाऊलखुणा सहजच पाहता आणि पडताळता येतात. त्या त्या काळातील संस्कृती, संपन्नता यांचं प्रतिबिंब या वास्तूंवर उमटल्याचं पाहायला मिळतं. महाराष्ट्रातले बहुतांश गडकिल्ले हे समुद्रकिनारी असल्याचं वा प्रत्यक्षात समुद्रात असल्याचं पाहायला मिळतं. मुख्यत्वे सागरी मार्गावर आपलं वर्चस्व राहावं, शत्रूवर नजर राहावी यासाठी या गडकिल्ल्यांची निर्मिती केली गेली.

अशाच काही किल्ल्यांपैकी एक आहे वसईचा किल्ला. मुंबईलगत साष्टी बेट होतं. ठाण्याचा प्रदेश होता. या बेटाचा मध्यवर्ती भाग हा टेकडय़ांनी व्यापला होता. या टेकडय़ांमधून वाहणाऱ्या लहानमोठय़ा नद्यांमुळे, तिथे असलेल्या दलदलीमुळे मुंबई हे बेट साष्टी बेटापासून वेगळं झालं. असं असलं तरी मुंबई आणि आजूबाजूच्या ठाणे परिसरात व्यापार करण्यासाठी मध्यवर्ती व्यापारी बंदर म्हणून हा किल्ला बांधण्यात आला. सोळाव्या-सतराव्या शतकात पोर्तुगीजांनी हा किल्ला विकसित केल्याचं म्हटलं जातं. अभ्यासकांच्या मते, पोर्तुगीजांच्या आधीही अकरा-बाराव्या शतकात हा किल्ला बोंगळे राजांनी बांधला होता. त्यानंतर १५ व्या शतकात तो गुजरातच्या सुलतानाने काबीज केला. त्यांच्याकडून तो पोर्तुगीजांनी आपल्या ताब्यात घेतला. पोर्तुगीजांशी तीन वर्षे ऐतिहासिक युद्ध करून चिमाजी अप्पा यांनी तो परत मिळवल्याची नोंद इतिहासात नमूद आहे. याचकरिता चिमाजी अप्पाचं स्मारक या ठिकाणी पाहायला मिळतं. हे स्मारकही पाहण्यासारखं आहे.

Know the history behind the historic temple dedicated to Yamraj, which Kangana Ranaut visited
कंगना रणौतने निवडणुकीतील यशासाठी घातले साक्षात यमराजालाच साकडे; काय आहे गूढ यमराज मंदिराचा इतिहास?
bhau rangari ganpati temple fire marathi news
भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळील जुन्या लाकडी वाड्याला आग
Gadchiroli, Police, Foil, Naxal Plot, near chattisgarh border, Seized Arms, Materials, maharashtra, marathi news,
गडचिरोली : नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळला; छत्तीसगड सीमेवरील तळ उध्वस्त
Leopard in Vasai Fort area fear among citizens
वसई किल्ला परिसरात बिबट्याचा वावर… नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडून शोध सुरू

या किल्ल्यावर पोहोचलं की, किल्ल्याची भव्यता लक्षात येते. ११० एकरांत हा किल्ला पसरला आहे. पोर्तुगीजांनी आपल्या व्यापारासाठी मुख्यत्वे या किल्ल्याचा वापर केल्याच्या खुणा इथल्या वास्तूत जागोजागी पाहायला मिळतात. महानगरपालिका, न्यायालय, कारागृह, रुग्णालय आदी वास्तूंच्या खुणा इथे पाहायला मिळतात. किल्ल्याला २०-२५ फुटांची भक्कम तटबंदी आहे जी कधीकाळी याहीपेक्षा अधिक होती. मात्र समुद्रात पडलेले भराव यामुळे काही तटबंदी ही पाण्याखाली गेल्याचं दिसून येतं.

किल्ल्याचं वैशिष्टय़ सांगायचं झालं तर इथे सात चर्च आणि चार मंदिरं आहेत. पोर्तुगीजांनी त्यांच्या वर्चस्वात ही चर्च बांधली होती. त्यानंतर जेव्हा चिमाजी अप्पांनी हा किल्ला जिंकला, तेव्हा त्यांनी आणि बाजीराव पेशव्यांनी अनुक्रमे दोन हनुमान मंदिरं बांधली, जी आजही तिथे पाहायला मिळतात. त्याव्यतिरिक्त वज्रेश्वरी आणि नागेश्वराचंही मंदिर इथे पाहायला मिळतं. एकाच ठिकाणी इतकी चर्च आणि मंदिरे असणारा हा बहुधा एकमेव किल्ला असावा. किल्ल्याला १० भक्कम बुरूज आहेत. सागरावर नजर ठेवण्यासाठी आणि युद्धाच्या वेळी तोफा डागण्यासाठी त्यांचा वापर होत असे. इथे ५० पेक्षा जास्त विहिरी असल्याचं बोललं जातं, पैकी १० विहिरी आजही जिवंत अवस्थेत दिसतात. किल्ल्याच्या तीनही बाजू सागराने वेढलेल्या असून, एकच बाजू जमिनीकडे जाते. किल्ल्याला दोन प्रवेशद्वारं आहेत. पैकी एक जमिनीलगत आहे, त्याला भुई दरवाजा असं म्हटलं जातं, तर दुसरा दरवाजा दर्या किंवा दिंडी दरवाजा म्हणून ओळखला जातो. विविध प्रकारची शिल्पं, इथली चर्चेस पाहणं हाही एक वेगळाच आनंद आहे. असं म्हणतात, मराठय़ांनी हा किल्ला जिंकल्यावर इथल्या चर्चेसमधील काही घंटा काढल्या आणि त्या मंदिरात बसवल्या. हा साराच इतिहास जाणून घेणं रंजक आहे. काही दुर्गप्रेमी गटांकडून त्याबाबत छान माहिती पर्यटकांना दिली जाते. संपूर्ण किल्ल्यावर पोर्तुगीजांचा ठसा जागोजागी जाणवत राहतो. हा किल्ला पाहताना कोकणातला तेरेखोलचा किल्ला आठवत राहतो. इथल्या कमानी, दरवाजे यावर गॉथिक आणि हिंदुस्तानी अशा दोन्ही शैलींचा वापर झालेला पाहता येतो.

इथलं आणखी एक आश्चर्य म्हणजे इथे पाहायला मिळणारं ५५३ फुटांचं भुयार. साहसवेडय़ा दुर्गप्रेमींसाठी हे भुयार विशेष आकर्षण ठरत असल्याचं अलीकडे पाहायला मिळतं. पूर्वी तिथे बंदरातून बोटींची वाहतूक मोठय़ा प्रमाणात होत असे. आता मात्र बोटींची मालवाहतूक पूर्णत: बंद आहे. मासेमारी करणं हा आजही तिथला प्रमुख व्यवसाय आहे. यामुळे किल्ल्यात आणि आजूबाजूच्या परिसरांत व्हेज आणि नॉनव्हेज खाण्याची उत्तम सोय उपलब्ध आहे.

वसई रेल्वे स्थानकात उतरून किल्ल्याकडे जायला सहज बस आणि रिक्षा उपलब्ध आहेत अथवा खासगी वाहनानेही तिथे जाता येतं. सध्या पुरातत्त्व विभागाकडून या किल्ल्याकडे विशेष लक्ष पुरवलं जातंय. टप्प्याटप्प्याने इथल्या प्रत्येक वास्तूचं सुशोभीकरण करण्याचं काम आगामी काळात करण्यात येणार असून त्यामुळे या किल्ल्याच्या दिमाखात अधिकच भर पडेल, अशी आशा वाटते. हेरिटेजचा दर्जा प्राप्त असलेला वसईचा किल्ला खरंच पाहण्यासारखा आहे. इतिहासाच्या पाऊलखुणा मिरवणाऱ्या या किल्ल्याला आवर्जून कधी तरी भेट द्या.

तृप्ती राणे

truptiar9@gmail.com