‘एमएमआरडीए’ला महापौरांचे पत्र;  संबंधित ठेकेदार, अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी

ठाणे येथील तीन हात नाका भागात बुधवारी रात्री मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून झाडांची कत्तल करण्यात आली असली तरी या घटनेकडे महापालिका प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची टीका सर्वत्र होऊ लागली आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे पत्राद्वारे केली आहे.

ठाणे आणि घोडबंदर परिसरात मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असून त्यासाठी महामार्गावर मार्गरोधक उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पामध्ये तीन हात नाका भागातील झाडे अडसर ठरत होती. बुधवारी रात्री ‘एमएमआरडीए’कडून या झाडांची कत्तल करण्यात आली. रात्रीच्या अंधारात घडलेल्या या प्रकरामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. ठाणे महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या परिसरात ही घटना घडली असून त्याकडे महापाालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची टीका होऊ लागली आहे. या घटनेबाबत काही सामाजिक संघटनांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे तक्रार केली

असून त्याआधारे म्हस्के यांनी महापालिका वृक्ष प्राधिकरण विभागाला लेखी पत्र दिले आहे. त्यामध्ये उच्च न्यायालयाचे बंदी आदेश असतानाही गेले दोन दिवस मेट्रो-४ प्रकल्पासाठी अंधारात झाडांची कत्तल केली जात असून ठाणे शहरातील विविध सामाजिक संघटनांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

रात्रीच्या वेळेत झाडे कापण्यासाठी न्यायालयाचे स्थगिती आदेश असतानाही झाडांची कत्तल करणे हे बेकायदेशीरच नव्हे तर पर्यावरणाच्या दृष्टीने चुकीचे आहे. याकडे महापालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. यामुळे महापालिकेची बदनामी होत आहे, असे मतही त्यांनी पत्रात व्यक्त केले आहे. रात्रीच्या वेळेत बेकायदेशीरपणे झाडांची कत्तल करण्याचे काम सुरू असल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास आल्यानंतर संबंधितांशी संपर्क साधला आणि त्यानंतर संबंधितांनी काम थांबवत असल्याचे उत्तर दिले आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

या प्रकारामुळे वृक्षप्रेमींमध्ये महापालिकेच्या भूमिकेबाबत गैरसमज निर्माण होत असून तो तातडीने दूर करणे गरजेचे आह.  तसेच याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. – नरेश म्हस्के,  महापौर