समाजाच्या मेलेल्या संवेदनेचे अंबरनाथमध्ये धक्कादायक दर्शन..

कौमार्य चाचणीवरून कंजारभाट समाजातील जातपंचायत वादाच्या भोवऱ्यात सापडली असतानाच अंबरनाथमधील एका तरुणाने अशा चाचणीला विरोध केला म्हणून समाजाने त्याच्यावर बहिष्कार टाकलाच, पण त्याच्या आजीच्या अंत्ययात्रेलादेखील हा बहिष्कार कायम राहिल्याने समाजाच्या मेलेल्या संवेदनेचेच दर्शन घडले आहे.

हा प्रकार इतक्यावरच थांबला नाही, तर अंत्ययात्रा सुरू असतानाच एका हळदी कार्यक्रमानिमित्त मोठय़ांदा डीजे लावून नाचगाण्यात आनंदही साजरा केला गेला. या गोष्टीची भलामण करणारे जातपंचायतीच्या एका नेत्याचे भाषण समाजमाध्यमांवर वेगाने प्रसारित झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणीचे प्रकार मधल्या काळात बाहेर आल्यानंतर या समाजातील जात पंचायत वादाच्या केंद्रस्थानी आली होती. जात पंचायतींच्या बहिष्काराची अशीच एक घटना अंबरनाथ शहरात समोर आली आहे. अंबरनाथमध्ये राहणारे विवेक तमायचीकर यांचे दीड वर्षांपूर्वी लग्न झाले. लग्नानंतर समाजातील जात पंचायतीच्या मागणीनुसार होणाऱ्या कौमार्य चाचणीला विवेक यांनी विरोध केला. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून समाजाच्या जात पंचायतीने त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार घातला आहे.

सोमवारी विवेक यांच्या आजीचे निधन झाले. या दु:खद प्रसंगी समाजातील लोकांनी धावून येणे आवश्यक होते. मात्र, समाजातील एकही व्यक्ती विवेक यांच्या आजीच्या अंत्ययात्रेत सहभागी झाली नाही. उलट धक्कादायक बाब म्हणजे त्याचवेळी समाजातील एका व्यक्तीच्या घरी हळदीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात समाजातील लोक सहभागी झाले. या कार्यक्रमासाठी डीजे वाजविला जात होता. हा डीजे बंद करण्याची समज समाजातील एकानेही दाखविली नाही. या उलट आपण एका व्यक्तीच्या निधनानंतर डीजे का बंद केला नाही, याचे कारण सांगत समाजातील खोटय़ा प्रतिष्ठेची फुशारकी मारणारे भाषण जातपंचायतीच्या एका नेत्याने या कार्यक्रमात केले. तसेच समाजातील कुणीही अंत्ययात्रेला जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले होते.

तक्रार दाखल करणार

गेल्यावर्षी समाजातील अनिष्ट परंपरेला विरोध केला आणि हा प्रकार उघडकीस आणला. त्यामुळे जात पंचायतीने माझ्यावर बहिष्कार टाकल्याचे विवेक तमायचीकर यांनी सांगितले. चित्रफितीत आमच्या जात पंचायतीचे नेते भाषण करताना दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले. आजीचे विधी उरकल्यानंतर याबाबत पोलिसात तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत जात पंचायतीच्या सदस्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.