दिवाळी नुकतीच झाली असली तरी अजूनही दिवाळीचा माहौल वातावरणात रेंगाळतोय. काही र्वष आपण सगळेच सुजाण नागरिक फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करतो. फटाक्यांपेक्षाही सुरांची आतिषबाजी केव्हाही सरसच ठरते! त्यामुळे दिवाळीची ‘एक्स्टेंडेड’ अशी सुरेल आतिषबाजी म्हणून कानसेनमध्ये आज सुप्रसिद्ध संगीतकार ‘ओ.पी. नय्यर’ यांचे जबरदस्त फॅन असणाऱ्या डोंबिवलीच्या मोहन सराफ यांना भेटू या.
मोहन सराफ हे मूळचे जळगावचे. लहानपणी त्यांना रेडिओ सिलोन ऐकायला खूप आवडत असे. गाणं कसं ऐकायचं, त्यातले म्युझिक पीसेस कसे समजून घ्यायचे हे त्यांना त्यांच्या वडिलांनी शिकवलं. सुप्रसिद्ध लेखक, जुन्या चित्रपट आणि सिनेसंगीताचे अभ्यासक दिवाकर गंधे हे त्यांचे मामा! त्यांच्यामुळेही गाण्यांची आवड निर्माण झाली. १९७२ मध्ये ते मुंबईत आले. जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. ते कॉलेजमध्ये असताना त्यांच्या काकांकडे रेकॉर्ड प्लेयर होता. कॉलेज शिक्षणाच्या दरम्यानच म्हणजे १९७४ मध्ये त्यांनी स्वत: रेकॉर्ड्स जमवायला सुरुवात केली. त्यांनी पहिली रेकॉर्ड विकत घेतली ती ‘खूबसूरत साथी’ या ‘दो दिलोंकी दास्तान’ चित्रपटातल्या गाण्याची. किशोरकुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं संगीतबद्ध केलं होतं ओ.पी. नय्यर यांनी. तेव्हापासून त्यांच्या संगीत संग्रहाला सुरुवात झाली आणि आज एल.पी.,ई.पी., ७८ आर.पी.एम. मिळून साधारण अडीच ते तीन हजार रेकॉर्डसचा संग्रह त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे प्रामुख्याने हिंदी आणि थोडय़ाफार प्रमाणात मराठी गाण्यांचा संग्रह आहे. साधारणत: १९८७ पासून रेकॉर्ड्स दुकानात मिळणं बंद झालं. मग त्यांनी चोरबाजारातून रेकॉर्ड्स आणायला सुरुवात केली. रेडिओवर ऐकलेल्या, आवडलेल्या गाण्यांची एक यादी त्यांच्या खिशात नेहमी असायची. चोरबाजारातल्या सलीमकडे त्या यादीतली बहुतेक गाणी मिळत असत. काही काही रेकॉर्ड्ससाठी मात्र त्यांना भरपूर किंमतही मोजावी लागली आहे.
मोहन सराफांचं वैशिष्टय़ म्हणजे ते संगीतकार ओ.पी. नय्यर यांचे विशेष चाहते आहेत. त्यांचे वडील आणि काकाही नय्यरसाहेबांचे चाहते! जवळजवळ पंचवीस र्वष मोहन सराफांचा नय्यरसाहेबांशी परिचय होता. सराफांनी घेतलेली पहिली रेकॉर्ड पण ओ.पी. नय्यर यांचीच आहे आणि त्यांची जवळजवळ सगळीच गाणी त्यांच्या संग्रहात आहेत. त्यांचं ओ.पी. नय्यर प्रेम इतकं आहे की १९८९ मध्ये नय्यरसाहेबांच्या वाढदिवसाच्या आदल्या रात्री मोहन सराफ, विलास डफळापूरकर आणि इतर दहा मित्रांनी मिळून त्यांची गाणी रात्रभर ऐकली! सकाळी सहा वाजता सगळे मिळून स्टेशनवर जाऊन चहा प्यायले आणि नय्यरसाहेबांच्या घरी सकाळी नऊ वाजता जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि रात्रभर त्यांची गाणी ऐकल्याचंही सांगितलं! असाच आणखी एक किस्सा नय्यरसाहेबांच्या १९९२ किंवा ९३ मधल्या वाढदिवसाचा! मोहन सराफ, त्यांचे वडील, काका, चुलतभाऊ राहुल असे सगळेजण त्यांच्या वाढदिवशी त्यांच्याकडे गेले आणि राहुलने त्यांना पियानो वाजवण्याची विनंती केली! खरं म्हणजे हे धाडसच, पण नय्यरसाहेबांनीही ती विनंती आनंदाने मान्य केली आणि पियानोवर ‘पूछोना हमें हम उनके लिये’ हे गाणं वाजवलं. २००७ मध्ये जेव्हा नय्यरसाहेबांचं देहावसान झालं तेव्हा शेवटी चितेवर ठेवून अग्नी देताना तिथे जमलेल्या सगळ्यांनी त्यांचीच गाणी गाऊन त्यांना अखेरची मानवंदना दिली. मोहन सराफांकडून ही घटना ऐकताना मन खरंच हेलावून गेलं! अशा भावपूर्ण वातावरणात ओ.पी.नय्यर यांचीच काही अवीट गोडीची गाणी ऐकतच मोहन सराफांच्या घरी रंगलेल्या संगीत-गप्पा मैफिलीची सांगता झाली!

– अंजली कुलकर्णी-शेवडे