लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचे आवाहन

देशातील नागरिकांकडून विविध कर रूपाने गोळा होणाऱ्या पैशांमधून सरकार अर्थसंकल्पामध्ये विविध योजनांचे नियोजन करत असते. मात्र, एखाद्या वस्तूच्या खरेदीवर कर भरावा लागू नये म्हणून अनेकजण दुकानदाराकडून बिल घेणे टाळतात. या वृत्तीमुळे सरकारच्या तिजोरीत कराचा पैसा जमा होत नाही आणि त्याचा परिणाम थेट अर्थसंकल्पावर होतो. त्यामुळे राष्ट्राच्या निर्माणासाठी नागरिकांनी कर भरण्याचे कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केले.

रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टच्या वतीने आयोजित ‘तारांगण-२०१८’ या कार्यक्रमाचे उद्घाटन महाजन यांच्या हस्ते झाले. अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी काय देण्यात आले, असा प्रश्न विचारण्यात येतो. मात्र, अर्थसंकल्प समाजातील प्रत्येक घटकांसाठी असल्यामुळे महिला काही वेगळ्या नसतात. त्यामुळे हा प्रश्नच चुकीचा असल्याचे वाटते. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यातील त्रुटी शोधण्यापेक्षा नागरिकांनी कर भरण्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे अशी सूचना त्यांनी केली.

विमानतळाचे काम २०१९ अखेर पूर्ण

नवी मुंबई विमानतळाचे काम डिसेंबर २०१९ अखेपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी कार्यक्रमात बोलताना दिली. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्ग हासुद्धा महत्त्वाचा प्रकल्प असून या मार्गामुळे दक्षिण मुंबई ते नवी मुंबई या प्रवासासाठी २५ मिनिटे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वाशी ते तळोजा मेट्रो प्रकल्पाचे काम वर्षअखेर पूर्ण करण्यात येईल. तसेच सीएसटी ते पनवेलला जोडणाऱ्या मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत, असेही त्यांनी सांगितले.