राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाची दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील दुष्काळी स्थिती यातना देणारी आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील महिलांचा विचार करून दहीहंडी रद्द करण्याचे ठरविले असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
जितेंद्र आव्हाड दरवर्षी ठाण्यामध्ये संघर्ष प्रतिष्ठान दहीहंडी कार्यक्रम आयोजित करीत असतात. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी करणे मनाला पटत नाही, असे सांगून ते म्हणाले, उत्सवांबाबत सरकार उदासीन आहे. दहीहंडीच काय गणेशोत्सव, नवरात्र साजरे होईल की नाही, मला माहिती नाही. मंडळ, आयोजक आणि पोलीस यांच्या संघर्ष घडावा, असेच सरकारचे प्रयत्न असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.