कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आज झालेल्या महासभेत शिवसेना आणि अपक्ष नगरसेवकाचे समर्थक आपापसांत भिडले. हा वाद मिटवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवले. यापूर्वीही या नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये वाद झाला होता.

कल्याण – डोंबिवली महापालिकेची आज महासभा झाली. महासभेत शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या समर्थकांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यामुळे पालिका सभागृहात काही वेळ गोंधळ उडाला होता. नगरसेवकांच्या समर्थकांमधील वाद विकोपाला जाऊ नये म्हणून पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवले. पोलिसांनी हस्तक्षेप केला नसता तर हे प्रकरण आणखी चिघळले असते, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांमधील वैयक्तिक वादाचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो, अशा शब्दांत अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला. या दोन गटांत वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशा प्रकारचे वाद त्यांच्यात झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांत चार वेळा या दोन्ही गटांत पालिका मुख्यालयाच्या आवारातच ‘राडा’ झाल्याची माहिती समजते. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे पालिका मुख्यालयातील सुरक्षा यंत्रणांची डोकेदुखी वाढल्याचे बोलले जात आहे.