लोकसत्ता प्रतिनिधी

कल्याण : कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या दुतर्फा वर्षांनुवर्षे भंगारात पडून असलेली बेवारस वाहने उचलण्यास सुरुवात करण्यात आली. वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असल्याने ही कारवाई हाती घेण्यात आली. कल्याण-डोंबिवली पालिका आणि कोळसेवाडी वाहतूक विभागाने ही वाहने हटविण्यास सुरुवात केली. गेल्या दोन दिवसांत ४० हून अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहने बाजूला करण्यात आली.

कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे प्रवाशी मागील दोन वर्षांपासून हैराण आहेत. मुंबई, नवी मुंबईकडे जाण्यासाठी अन्य कोणताही पर्यायी मार्ग नसल्याने नाइलाजाने प्रवाशांना शिळफाटा रस्त्याचा आधार घ्यावा लागतो. ७० ते ८० फूट रुंदीचा हा रस्ता आता सर्व प्रकारच्या वाहनांना अपुरा पडू लागला. या रस्त्याच्या बाजूच्या कच्च्या पाच फुटाच्या रस्त्यांवरूनही दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना वाहतूक करावी लागत आहे. या रस्त्यावर चौक, पोहच रस्ते आहेत. तसेच या शिळफाटा रस्त्याच्या कडेला वर्षांनुवर्षे अपघातामुळे पडून असलेली तसेच भंगार झालेली वाहने उभी केली जात आहे. तसेच स्थानिकांकडून रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होत आहे. अशा प्रकारची पत्रीपूल ते शिळफाटा कल्याण फाटय़ापर्यंत अनेक वाहने रस्त्याच्या कडेला उभी केल्याचे दिसून येते. सर्वाधिक बेवारस भंगार वाहने नेतिवली, तिसगाव नाका, सोनारपाडा, गोळवली, दावडी, मानपाडा भागांत दिसून येतात. ही वाहने वाहतुकीला अडथळा ठरत असल्याच्या तक्रारी वाहतूक विभाग, पालिका प्रशासनाकडे नागरिकांकडून करण्यात येत होत्या. त्यावर कोळसेवाडी वाहतूक विभागाच्या साहाय्याने ही वाहने तेथून उचलण्याचे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ई, आय प्रभागाच्या प्रभाग अधिकाऱ्यांना दिले होते.

आठवडाभर कारवाई

दोन दिवसांपासून अशा प्रकारची वाहने उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पत्रीपूल ते पलावा चौकापर्यंत शिळफाटा रस्त्याच्या कडेची सर्व प्रकारची वाहने येत्या दिवसात उचलण्यात येणार आहेत, असे प्रभाग अधिकारी किशोर ठाकूर यांनी सांगितले. ई, आय प्रभागाच्या शिळफाटा रस्त्यांतर्गत येणारी चारचाकी, दुचाकी, दोन हायड्रा, मोटार सायकल, स्कूटर, डम्पर, हातगाडय़ा, लोखंडी वस्तूंची वाहतूक करणाऱ्या हातगाडय़ा, टेम्पो अशी वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई आठवडाभर सुरू राहणार आहे. यापुढे अशा प्रकारची शिळफाटा रस्त्याच्या कडेला बेवारस वाहने टाकणाऱ्या वाहन मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असे ठाकूर यांनी सांगितले.