पोलीस संरक्षणाविना पालिकेची कारवाई; राष्ट्रपुरुषांचा अवमान होणार नाही याची खबरदारी

पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाजवळ एका समाजसेवकाने पालिकेला अंधारात ठेवून बेकायदा बांधकाम उभारले होते. या बांधकामावर कारवाई होऊ नये, म्हणून या कार्यकर्त्यांने मोठय़ा चलाखीने तेथे राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा ठेवल्या होत्या. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांसमोर या बेकायदा बांधकामावर कारवाई कशी करायची, असा पेच निर्माण झाला होता. रामनगर पोलिसांनी हे बेकायदा बांधकाम तोडण्यास पोलीस संरक्षणास नकार दिला असताना अखेर बुधवारी पालिका अधिकारी आणि पालिका बंदोबस्तावरील पोलीस यांच्या उपस्थितीत हे बेकायदा बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.

द्वारली गावातील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन’ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषचंद्र बोराडे यांनी हे बेकायदा बांधकाम केले असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत उघडकीस आले आहे. गेल्या आठवडय़ात पालिकेला सलग तीन दिवस सुट्टी असल्याने बोराडे यांनी पालिका कार्यालय आणि के. बी. वीरा शाळेमधील मोकळ्या जागेत एक गाळा बांधला होता. हे काम अर्धवट राहिल्याने तेथे पालिकेने कारवाई करू नये, म्हणून बोराडे यांनी त्या बेकायदा बांधकामाच्या आतील भागात शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज अशा राष्ट्रपुरुषांच्या मांडून ठेवल्या, जेणेकरून पालिकेने या बेकायदा बांधकामावर कारवाई केली तर अधिकाऱ्यांनी राष्ट्रपुरुषांचा अवमान केला म्हणून आवई उठवायची, अशी एक खेळी त्यामागे होती.

‘फ’ प्रभागाच्या प्रभाग अधिकारी श्वेता सिंगासने यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्या वेळी तात्काळ कारवाई केली तर हेतुपुरस्सर या प्रकरणाला वेगळा रंग दिला जाण्याची शक्यता होती. त्यामुळे रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पवार यांच्याकडे हे बेकायदा बांधकाम तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी पालिकेकडून करण्यात आली. त्या वेळी पोलिसांनी बंदोबस्त देण्याऐवजी हे काम करणाऱ्याने काही जिवाचे बरेवाईट केले तर, ते बांधकाम पूर्ण होऊ द्या मग तोडू, अशी उलट भूमिका रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पवार घेताना पोलीससुद्धा कसे बेकायदा बांधकामांचे संरक्षण करतात हेही यानिमित्ताने अधोरेखित केले. अखेर सिंगासने यांनी पालिकेच्या बंदोबस्तावरील पोलीस आणि ‘फ’ प्रभागातील कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने बेकायदा बांधकामाच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष कारवाईचा निर्णय घेतला.

कारवाईचा पंचनामा आणि चित्रीकरण

घटनास्थळी बांधकामधारक बोराडे उपस्थित होते. पोलिसांनी बोराडे यांना समज देऊन त्या प्रतिमा उचलण्याचे सुचविले. प्रतिमा उचलण्याचा रीतसर पंचनामा व दृश्यचित्रफितीद्वारे त्याचे चित्रीकरण केले. मग, पालिका पथकाने हे बेकायदा बांधकाम जमीनदोस्त केले. तरी, या जागेवर आपण पुन्हा बांधकाम करूच, अशी दर्पोक्ती बोराडे यांनी अधिकाऱ्यांसमोर केली आहे. असे बांधकाम पुन्हा केले तर मग आपल्यावर ‘एमआरटीपी’अंतर्गत गुन्हा दाखल होईल, असा इशारादेखील पालिका अधिकाऱ्यांनी दिला आहे.