कल्याण-डोंबिवली पालिकेची धडक कारवाई; सागाव, भोपर, नांदिवलीपाडय़ात पाणीचोरी

डोंबिवली जवळील सागाव, नांदिवली पाडा भागातील पालिकेच्या मुख्य जलवाहिनीला जोडलेल्या १५ इमारतींमधील बेकायदा नळजोडण्या ‘ई’ प्रभाग व पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तोडल्या. नांदिवलीपाडा, सागाव, भोपर या भागात मोठय़ा प्रमाणात पाणी चोरी होत आहे. बेकायदा बांधकामांना हे पाणी वापरले जात असल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या.

पाणी चोरीच्या विषयावर या भागातील स्थानिक नगरसेवक गुपचिळी धरून बसले आहेत. या नगरसेवकांचा बेकायदा बांधकामांना आशीर्वाद असल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले. महापालिका पाणीपुरवठा करीत नाही असे साांगायचे आणि रहिवाशांचे पाणी बेकायदा बांधकामांना वापरायचे असा प्रकार या गावांमध्ये राजरोसपणे सुरु असल्याचे चित्र आहे. या पाणी चोरीवर महापालिका अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही. नांदिवली पंचानंद, भोपर, देसलेपाडा भागात मोठय़ा प्रमाणात बेकायदा चाळी, इमारती उभारण्यात येत आहेत. या बांधकामांना महापालिकेच्या जलवाहिन्यांवरून चोरून नळ जोडण्या घेतल्या जात आहेत. त्यामुळे रहिवाशांना मुबलक पाणी मिळत नाही असे तज्ञांचे म्हणणे आहे. कर भरणा करूनही इमारतीला पाणीपुरवठा होत नसल्याने सोसायटय़ांमधील काही रहिवासी पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर छिद्र पाडून तेथून नळ जोडण्या घेत आहेत. पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन या चोरीच्या नळ जोडण्यात घेण्यात येतात. विशेष म्हणजे अशाप्रकारे पाण्याची चोरी करून पाणी वापर करणारे रहिवासी पालिकेला पाणीपट्टीचा एक पैसा भरणा करीत नाहीत. पाण्याचा वाढता वापर, त्यात चोरीच्या नळजोडण्या, तिजोरीला बसणारा फटका हा विचार करून जलअभियंता चंद्रकांत कोलते, कार्यकारी अभियंता राजीव पाठक, उपअभियंता योगेंद्र राठोड, देवेंद्र एकांडे, पोलीस अधिकारी वेलके व त्यांच्या पथकाने २७ गावांच्या हद्दीतील सागावमधील चेरानगर, रविकिरण सोसायटी परिसरातील १५ इमारतींच्या चोरीच्या १९ नळ जोडण्या खंडित केल्या. ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे. येत्या दोन दिवसात २७ गावांमधील बेकायदा बांधकामे तोडण्याची मोहिम हाती घेण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पालिका अधिकाऱ्याने सांगितले.