पाण्याचे टँकर न पुरवण्याचे पालकमंत्र्यांचे पालिकांना आदेश
राज्यभर पाणीटंचाईचे संकट गहिरे होत असताना यंदा रंगपंचमीला पाण्याचा दौलतजादा परवडणारा नाही. हे लक्षात घेऊन यंदा ठाणे जिल्ह्यातील एकाही महापालिकेने रंगपंचमीसाठी वसाहती, खासगी संकुले आणि पाण्याची उधळपट्टी करणाऱ्या खासगी रिसोर्ट चालकांना पाण्याचे टँकर पुरवू नयेत, असे सक्त आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिले. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी केली जाईल, असे ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेने स्पष्ट केले आहे.
यंदा पावसाने ओढ घेतल्याने संपूर्ण राज्यभर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ठाणे जिल्ह्यातील बारवी आणि आंदर धरणातील पाणीसाठाही कमालीचा रोडावला आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने जिल्ह्यातील प्रमुख महापालिकांना ३० टक्के तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला ५५ टक्क्यांची पाणी कपात लागू केली आहे. हे प्रमाण येत्या काळात वाढण्याची शक्यता असून नवी मुंबई महापालिकेनेही सायंकाळचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद केला आहे. बारवी आणि आंदर धरणातील पाणी किमान जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत उपयोगात यावे यासाठी नियोजन केले जात असले तरी एमआयडीसीसह इतर स्थानिक स्वराज्य संस्था पाण्याचा बेसुमार उपसा करीत असल्याने जलसंपदा विभागाने यापूर्वीच चिंता व्यक्त केली आहे.
राज्य सरकारने पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर विविध प्रकारचे कार्यक्रम हाती घेतले असून जलसप्ताहानिमित्त पाणी वाचविण्याचे संदेश दिले जात आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून ठाणे शहरात सोमवारी जल दौड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रंगपंचमी खेळण्यासाठी टँकर पुरविले जाणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका घेतली. जिल्ह्यात रिसोर्ट तसेच मोठय़ा क्लबची संख्या बरीच मोठी आहे. तेथेही रंगपंचमीनिमित्त कार्यक्रमांची आखणी सुरू आहे. रंगपंचमीसाठी एकही टँकर देता कामा नय, असे स्पष्ट आदेश आपण जिल्ह्यातील सर्व महापालिकांना दिले आहेत, असे पालकमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. पाणीपुरवठा करण्यासाठी वसाहतीचे पत्र घेऊन टँकरचालक जलकुंभांकडे येतील. त्यामुळे पाणीपुरवठय़ासाठी पाणी हवे की रंगपंचमी खेळण्यासाठी याची पूर्णपणे खात्री करून घ्या, असेही आपण सर्व महापालिकांमधील प्रशासकीय प्रमुखांना कळविले आहे, असे ते म्हणाले.