पालिकेकडून देण्यात आलेल्या उपलब्ध खाटांच्या माहितीत विसंगती
कल्याण : शहरातील एकूण करोना रुग्णांची संख्या आणि करोना रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती नागरिकांना तात्काळ उपलब्ध व्हावी या उद्देशाने महापालिका प्रशासनातर्फे खास संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. मात्र, या संकेतस्थळावर देण्यात आलेली शहरातील रुग्णांची संख्या आणि करोना रुग्णालयात उपलब्ध असलेल्या खाटांच्या संख्येत मोठी तफावत दिसत असून या नव्या संकेतस्थळाचा रुग्णांना प्रत्यक्षात कोणताही उपयोग होत नाही असे चित्र आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या महिनाभरापासून करोना रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढू लागली आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे. या काळात एकूण रुग्णांची आकडेवारी तसेच शहरातील रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या ही माहिती तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी महापालिका प्रशासनाने मुख्य संकेतस्थळावर स्वतंत्र डॅशबोर्ड तयार केला आहे. यावर करोना रुग्णांची संख्या, सक्रिय करोना रुग्णांची संख्या आणि करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या देण्यात आली आहे. मात्र, देण्यात आलेल्या आकडय़ांमध्ये आणि शहरातील प्रत्यक्ष आकडय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणात तफावत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या शहरातील एकूण २० हजार ९०७ नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. यातील १५ हजार २५५ रुग्ण करोनामुक्त झाले असून ५ हजार ४१५ रुग्ण उपचार घेत आहेत. या संकेतस्थळावर शहरातील एकूण रुग्णांची संख्या केवळ ३ हजार ५२१ इतकी दर्शवत आहे. त्याचबरोबर या संकेतस्थळावर शहरातील करोना रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या साध्या आणि व्हेंटिलेटर खाटांची संख्या दर्शवण्यासाठी ग्राफिक्सचा वापर करण्यात आला आहे. त्यामध्ये करोना रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर खाटांची संख्या केवळ २२ असल्याचे दर्शवत असून प्रत्यक्षात मात्र त्याहून अधिक ७८ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. या माहितीमध्ये मोठी तफावत असल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नेमकी खरी माहिती कोणती असा प्रश्न आता शहरातील नागरिकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.
रुग्णालयांचा असहकार
कल्याण-डोंबिवलीच्या संकेतस्थळावर महापालिका क्षेत्रातील सहा करोना रुग्णालयांची माहिती देण्यात आली आहे. ही माहिती अपडेट करण्यासाठी रुग्णालयाकडून रोजच्या रोज माहिती मिळणे आवश्यक आहे. मात्र, पालिकेला माहिती देण्यास रुग्णालय प्रशासन सहकार्य करत नसल्यामुळे माहिती अपडेट होण्यास विलंब होत असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. तर, याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.