माघी गणेशोत्सवानिमित्त महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या नाचगाण्यांच्या कार्यक्रमात पैसे उडवणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. मागील साडेचार वर्षांत बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई न झाल्याने काही कर्मचारी शेफारले आहेत. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने या कर्मचाऱ्यांना बेशिस्त वर्तणुकीवरून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्त मधुकर अर्दड यांच्या मान्यतेनंतर या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

अनेक वर्षांपासून महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने रात्रीच्या वेळेत महिलांच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात काही गाण्यांच्या ठेक्यावर महापालिका कर्मचाऱ्यांनी ताल धरून गाणे गाणाऱ्या महिलांवर पैशांची उधळण केली. नाचगाणे करणारे एकूण पाच कर्मचारी प्रशासनाच्या रडारवर आहेत. पालिका आवारात या कार्यक्रमाला परवानगी कोणी दिली यावरून फ व ग प्रभागाचे प्रभाग अधिकारी यांनाही जाब विचारण्यात येणार असल्याचे समजते. कारवाईच्या वृत्ताला एका पालिका अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे.