निधीअभावी ३० ते ४० बसगाडय़ा आगारात धूळखात; अपुऱ्या बससेवेमुळे नोकरदारांचे हाल

भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण : करोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेली टाळेबंदी आणि त्यानंतरच्या काळात कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे बसगाडय़ांच्या दुरुस्तीसाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्यामुळे आगारात ४० बसगाडय़ा दुरुस्तीअभावी धूळ खात उभ्या आहेत. त्यामुळे टाळेबंदी शिथिलीकरणानंतर शहरातील रस्त्यांवर पुरेशा क्षमतेने बसगाडय़ा चालविण्यात येत नसून त्याचा फटका गेल्या काही महिन्यांपासून बससेवेवर अवलंबून असलेल्या नोकरदार वर्गाला बसत आहे.

कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात एकूण १३७ बसगाडय़ा आहेत. त्यापैकी सध्या ६० बसगाडय़ा शहरातील विविध मार्गावर चालविण्यात येतात, तर ३७ बसगाडय़ा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी चालविण्यात येतात. उर्वरित ४० बसगाडय़ा आगारात दुरुस्तीअभावी उभ्या आहेत. यंदा अर्थसंकल्पातील नियोजनाप्रमाणे मार्च महिन्यानंतर १३७ बस रस्त्यावर आणण्याचे नियोजन होते. परंतु करोनामुळे हे शक्य झालेले नाही.

करोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी लागू करण्यात आल्याने सर्व व्यवहार बंद झाले. त्यामुळे परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ांमधील प्रवासी संख्या घटली. त्यामुळे टाळेबंदीच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ३७ बसगाडय़ा चालविण्यात येत होत्या. उर्वरित बसगाडय़ा आगारातच उभ्या होत्या. टाळेबंदी शिथिलीकरणानंतर या बसगाडय़ा प्रवासी सुविधेसाठी विविध मार्गावर चालविण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, यापैकी ४० बस पाच-सहा महिने एकाच जागी उभ्या असल्याने त्यांची देखभाल, दुरुस्ती करावी लागणार आहे.

केडीएमटीच्या १०० बस प्रवासी सेवेसाठी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कार्यशाळेत बस दुरुस्त करण्याचे काम सुरू केले आहे. लवकरच मलंगगड, भिवंडी मार्गावर बस सेवा सुरू केली जाणार आहे.

मनोज चौधरी, सभापती

सहा महिने बस एकाच जागी असल्याने त्यांची देखभाल करून त्या प्रवासी वाहतुकीसाठी रस्त्यावर आणाव्या लागतील. या बस एकाचवेळी दुरुस्त करण्यात निधीची अडचण आहे. कार्यशाळेत कर्मचाऱ्यांचे प्रमाण कमी आहे.

मिलिंद धाट, महाव्यवस्थापक, केडीएमटी

परिवहनचे आर्थिक नुकसान

करोना महासाथ सुरू होण्यापूर्वी म्हणजेच जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत केडीएमटीला दररोज पाच लाख आणि महिन्याकाठी दीड कोटीचे तिकीट विक्रीतून उत्पन्न मिळायचे. हे उत्पन्न आता लाखावर आले आहे. मार्च ते ऑगस्ट कालावधीत केडीएमटीचे सात ते आठ कोटींचे नुकसान झाले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. तसेच महापालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे महापालिकेकडून परिवहन उपक्रमाला अनुदान मिळू शकलेले नाही.