डोंबिवली पूर्व भागातील बाजीप्रभू चौकातील हनुमान मंदिराला याच चौकातील कल्याण- डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाची चौकशी कार्यालयाच्या जागेवर वसविण्यात येणार आहे. त्यामुळे ‘केडीएमटी’चे चौकशी कार्यालय चौकातील सार्वजनिक स्वच्छतागृह असलेल्या ठिकाणी हलविण्यात आले आहे. स्वच्छतागृहातून सतत दरुगधी येत असल्याने ‘केडीएमटी’चे चालक, वाहक या केबिनमध्ये बसण्यास नकार देत असून नाराजी व्यक्त करीत आहेत.

बाजीप्रभू चौकातून एमआयडीसी निवासी तसेच २७ गावांच्या परिसरात केडीएमटीच्या बस सोडण्यात येतात. या बसचे नियंत्रण करण्यासाठी डोंबिवली मध्यवर्ती ग्राहक भंडाराच्या समोरच्या जागेत केडीएमटीचे चौकशी कार्यालय होते. या कार्यालयात नियंत्रक बसत होता. विद्यार्थ्यांना पास, बसच्या वेळेची माहिती प्रवाशांना देण्यात येत होती. वाहक, चालक, कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी हा निवारा होता. हा निवारा मंदिराच्या कामासाठी मूळच्या ठिकाणापासून पुढील तीस फुटांपर्यंत हलविण्यात आला आहे. स्थलांतरित केलेल्या कार्यालयाच्या केबिनपुढील भागात सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. या ठिकाणी सतत दरुगधी येते. त्यामुळे वाहक, चालक येथे बसण्यास नकार देत आहेत. ‘बाजीप्रभू चौकातून दिवस-रात्र केडीएमटी उपक्रमाच्या बस धावत असतात. या बसचे नियंत्रण या ठिकाणाहून केले जाते. विद्यार्थ्यांना येथून बस प्रवासाचे पास मिळतात. हे ठिकाण स्वच्छतागृहाच्या ठिकाणी हलवून महापालिका प्रशासनाने आपल्याच एका विभागाच्या कर्मचाऱ्यांची गैरसोय केली आहे. दरम्यान, केडीएमटी बसचे नियंत्रण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी चांगली जागा नसेल, तर ते बसचे योग्य नियंत्रण कसे करतील. कर्मचाऱ्यांची टपरी पावसाळ्यात पूर्णपणे गळत होती. त्या ठिकाणी कर्मचारी छत्री घेऊन बसल्याचे आपण पाहिले आहे. कोटय़वधीचा अर्थसंकल्प असलेल्या प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांची अशी गैरसोय करू नये, अशी मागणी परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी केली आहे.