|| किशोर कोकणे

फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन

ठाणे : गेल्या काही वर्षांपासून मंदगतीने सुरू असलेल्या कोपरी रेल्वे पुलाच्या दोन अतिरिक्त मार्गिकांच्या कामाला करोनाकाळात वेग आला असून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने फेब्रुवारी २०२१ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. हे काम पूर्ण होताच या अतिरिक्त मार्गिकांवरून वाहतूकही सुरू करता येणार आहे, अशी माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

या दोन मार्गिकांचे काम पूर्ण झाल्यानंतर मुख्य रेल्वे पुलाचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी मोठ्या तुळई (गर्डर) आणण्यात आल्या आहेत. हे काम पूर्ण करण्यासाठी २०२२ उजाडण्याची शक्यता आहे.

पूर्व द्रुतगती मार्ग हा ठाण्याहून मुंबईत जाणाऱ्या आणि मुंबईहून ठाण्यात येणाऱ्या वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून दिवसाला हजारो वाहने ये-जा करत असतात. या महामार्गाचा भाग कोपरी रेल्वे पुलाजवळ अरुंद होतो. या अरुंद रस्त्यामुळे सकाळी आणि रात्रीच्या वेळेत दररोज वाहनचालकांना वाहतूक कोंडीत अडकावे लागते. गेल्या चार ते पाच वर्षांपासून एमएमआरडीए आणि रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाअभावी हे काम रखडले आहे. दोन वर्षांपूर्वीच या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पाच्या अतिरिक्त मार्गिका निर्माणाचे काम एमएमआरडीएकडून सुरू आहे, तर रेल्वे पुलाचा भाग रेल्वे प्रशासन करणार आहे.

सध्या एमएमआरडीएने या रेल्वे पुलाला लागून ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आणि मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर एक-एक अतिरिक्त मार्गिका तयार करण्याचे काम ७० टक्के पूर्ण केलेले आहे. या दोन्ही मार्गिका २०२१ च्या फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीस पूर्ण केल्या जाणार असल्याची माहिती एमएमआरडीएच्या अभियंत्यांकडून देण्यात आली आहे. या दोन अतिरिक्त मार्गिकांचे काम पूर्ण झाल्याने या दोन्ही मार्गावर प्रत्येकी दोन-दोनपदरी मार्गिका मिळणार आहे. या मार्गिकांवरून मुंबई ये-जा करणारी वाहतूक काढली जाणार आहे. त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून मुख्य रेल्वे पुलाचे काम हाती घेतले जाणार आहे. मात्र हे काम पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला सुमारे एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे २०२२ नंतरच कोपरी रेल्वे पुलावरील कोंडीतून प्रवाशांची मुक्तता होणार आहे.

सध्या काय परिस्थिती आहे?

पूर्व द्रुतगती महामार्ग दोन्ही मार्ग मिळून एकूण सहापदरी मार्गिका आहेत. मात्र, कोपरी पुलावर या मार्गिका चारपदरी होतात. त्यामुळे सकाळी वाहतूक पोलिसांना मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी अडथळे उभारून कार जाईल इतकी अतिरिक्त मार्गिका केली जाते. रात्रीच्या वेळी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येण्यासाठीही अशाच प्रकारे अडथळ्यांच्या मदतीने अतिरिक्त मार्गिका तयार करावी लागते. तसेच गेल्या काही दिवसांपासून येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हलक्या वाहनांना बाराबंगलामार्गे चेकनाक्याच्या दिशेने वाहतूक सोडली जात आहे.