तिन्ही बाजूला इमारतींची गर्दी, अरुंद खोल्या,अग्निसुरक्षा यंत्रणेचा अभाव

ठाणे : मुंब्रा येथील शिमला पार्क भागातून जाणाऱ्या जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या हुसेन टॉवर इमारतीत थाटण्यात आलेल्या प्राईम क्रिटिकेअर या बिगर करोना रुग्णालयात बुधवारी पहाटे आग लागून झालेल्या दुर्घटनेने ठाणे महापालिका हद्दीत गल्लोगल्ली उभ्या राहीलेल्या रुग्णालयांमधील अग्निरोधक यंत्रणेतील त्रुटींचे भयावह वास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणले. या रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ प्रशस्त जागा असल्याने आतही सगळे व्यवस्थित असेल असा कुणाचाही समज व्हावा. प्रत्यक्षात मात्र रुग्णालयाला तिन्ही बाजूला खेटून असलेल्या इमारती, आत शिरण्यासाठी अत्यंत निमुळता असा मार्ग आणि अरुंद खोल्यांचे या रुग्णालयाला परवानगी तरी कशी मिळाली, असा सवाल आता उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, अग्निरोधक यंत्रणेचा लवलेशही याठिकाणी दिसत नव्हता.

Rats in operating theaters of V N Desai Hospital
व्ही. एन. देसाई रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहांमध्ये उंदरांचा सुळसुळाट
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
india demand of land marathi news
कार्यालयीन जागांच्या मागणीत ४३ टक्के वाढ, पहिल्या तिमाहीत १.६२ कोटी चौरस फुटांचे व्यवहार; बंगळूरुचा सर्वाधिक वाटा

मुंब्रा येथील कौसा भागातील शिमला पार्कमध्ये आठ मजली हुसेन टॉवर आहे. याच टॉवरमधील तळ आणि पहिल्या मजल्यावर प्राईम क्रिटीकेअर रुग्णालय थाटण्यात आले आहे. या रुग्णालयाचे प्रवेशद्वार जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत आहे. त्यामुळे रुग्णवाहिका रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहचू शकतील इतकी जागा येथे आहे. प्रवेशद्वार पाहीले की रुग्णालय प्रशस्त असावे असे कुणालाही वाटेल. मात्र, प्रत्यक्षात या रुग्णालयाच्या तिन्ही बाजूला खेटून इमारती उभ्या आहेत. दोन इमारतींमध्ये जेमतेम तीन-चार फुटांचे अंतर आहे.

येथे तळ मजल्यावरूनच पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी मार्ग तयार करण्यात आला होता. तळ मजल्यावर अतिदक्षता विभाग तर, पहिल्या मजल्यावर सामान्य कक्ष आणि इतर विभाग होते. अतिशय छोट्या जागेमध्ये हे रुग्णालय उभारण्यात आले होते. या रुग्णालयात आपत्कालीन मार्गच उपलब्ध नाही. अग्निशमन सुरक्षा यंत्रणेच्या नावाने बोंबच. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने या रुग्णालयाला दोनदा नोटीस बजावून अग्निशमन सुरक्षा यंत्रणा उभारण्यास सांगितले होते. मात्र, त्याकडेही रुग्णालयाने दुर्लक्ष केले आणि नोटीस बजावून अग्निशमन विभागही मौनात गेल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे.

किरीट सोमय्यांना पिटाळले

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दुर्घटनाग्रस्त रुग्णालयात येऊन महाविकास आघाडीवर टीका केली. त्यावेळी घटनास्थळी मदतकार्य करीत असलेले महापालिकेचे विरोधी पक्ष नेते शानू पठाण हे संतप्त झाले आणि त्यांनी सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांना पिटाळून लावले. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. दरम्यान, आम्ही जनतेचे जीव वाचविण्याला महत्व देत आहोत. प्रत्यक्ष मदतीच्या वेळी घरात बसणारे येथे येऊन राजकारण करीत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. ही वेळ राजकारणाची नाही. जगलो तर राजकारण करुच. पण, टीका करण्यापूर्वी हिम्मत असेल तर केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळवून दाखवा, असे पठाण यांनी सांगितले.

मुंब्रा येथील प्राईम क्रिटीकेअर या रुग्णालयामध्ये पहाटे आग लागून त्यात अतिदक्षता विभागातील ४ रुग्णांचा मृत्यू झाला. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस, ठाणे महापालिका अधिकारी आणि डॉक्टर यांची चौकशी समिती नेमण्यात येणार आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख तर जखमींच्या नातेवाईकांना एक लाखांचे अर्थसाह्य करण्यात येणार आहे – जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री 

 

अग्निशमन सुरक्षा तपासणीसाठी मुंब्रा-कौसा भागातील रुग्णालयांनी महापालिकेकडे अर्ज केल्यानंतरही त्यांना योग्य प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे रुग्णालयांचे व्यवस्थापन मनमानी करीत आहेत. जर, वेळीच या रुग्णालयांना महापालिकेकडून मदत झाली असती तर, त्यांनी नक्कीच अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित केली असती. त्यातून पालिकेचे उत्पन्नही वाढले असते. – शानू पठाण, विरोधी पक्ष नेता, ठाणे महापालिका

ठाणे शहरातील खासगी रुग्णालयांच्या अग्निशमन सुरक्षा यंत्रणांची पाहाणी केली होती. त्यावेळेस मुंब्य्रातील प्राईम क्रीटीकेअर रुग्णालयामध्ये केवळ अग्निरोधक सिलिंडर होते. त्यामुळे या रुग्णालयाला अग्निशमन यंत्रणा बसविण्यासाठी डिसेंबर आणि फेबु्रवारी महिन्यात अशी दोनदा नोटीस बजावली होती. तसेच या रुग्णालयाला अग्निशमन ना हरकत दाखला देण्यात आलेला नव्हता.- गिरीश झळके, मुख्य अग्निशमन अधिकारी, ठाणे महापालिका