लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : राज्य सरकारने केलेल्या फटाके न फोडण्याच्या आवाहनाला शहरातील नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद दिल्यामुळे यंदा दिवाळीच्या कालावधीत फटाक्यांमुळे लागणाऱ्या आगीच्या घटनांमध्ये ६६ टक्क्यांनी घट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. शहरात गेल्या वर्षी दिवाळीच्या दिवसांमध्ये २१ आगीच्या घटना घडल्या होत्या. यंदा १४ ठिकाणी आग लागण्याच्या घटनांची नोंद ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे करण्यात आली असून गेल्या तीन वर्षांमधील यंदाचे प्रमाण अत्यंत कमी आहे.

दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाक्यांमुळे विविध ठिकाणी आग लागण्याचे अनेक प्रकार घडत असतात. या आगींमध्ये मानवी हानीसह मालमत्तेचेही नुकसान होण्याची शक्यता असते. ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या अहवालानुसार २०१७ च्या दिवाळीत १७ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर या पाच दिवसांच्या कालावधीत २० ठिकाणी आग लागली होती, तर २०१८ च्या दिवाळीत ५ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत ५३ ठिकाणी आग लागली होती. तसेच २०१९ च्या दिवाळीत २५ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर  या कालावधीत २१ ठिकाणी आग लागण्याच्या घटनांची नोंद करण्यात आली होती. मात्र, यंदाच्या वर्षी करोनामुळे शासनाने फटाके न फोडण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. या आवाहनाला शहरातील नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद दिल्याचे दिवाळीच्या सणादरम्यान पाहायला मिळाले. त्यामुळे यंदा शहरात फटाक्यांमुळे लागणाऱ्या आगीचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे.

यंदा १४ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत १४ ठिकाणी आग लागण्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये शहरातील कोपरी, नौपाडा, रामचंद्रनगर, ज्ञानेश्वरनगर, इंदिरानगर, कासारवडवली, वसंतविहार, ठाणे बाजारपेठ, मुंब्रा स्थानक परिसर, उपवन तलाव, शिळफाटा आणि हिरानंदानी इस्टेट या ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे  करण्यात आली आहे.

गेल्या एका वर्षांपासून नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी कमी केली आहे. त्यामुळे या वर्षी आगीच्या घटनांमध्ये घट झाली असल्याचे ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांच्याकडून सांगण्यात आले आहे.